Sachin Tendulkar Tweet on Narendra Modi 3.0 : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर नेहमी चर्चेत असतो. आतादेखील सचिन त्याच्या एका ट्विटमुळे चर्चेत आला आहे. वास्तविक, नरेंद्र मोदी पुन्हा भारताचे पंतप्रधान झाले आहेत, या आनंदाच्या प्रसंगी सचिनने X वर पोस्ट करून नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. ९ जून रोजी नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली.
सचिन तेंडुलकरने ११ जून २०२४ रोजी सकाळी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे. सचिनने लिहिले, "जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे नेते म्हणून तिसऱ्यांदा निवडून आल्याबद्दल माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन. भारताला नवीन उंचीवर नेण्याच्या तुमच्या प्रवासासाठी शुभेच्छा."
नरेंद्र मोदी यांनी ९ जून रोजी पंतप्रधानपदाची तिसऱ्यांदा शपथ घेतली. त्यांच्यासोबत ७२ मंत्र्यांनीही शपथ घेतली. यामध्ये अमित शहा, नितीन गडकरी, राजनाथ सिंह या जुन्या मंत्र्यांचा समावेश होता.
तर जेपी नड्डा, शिवराज सिंह चौहान या नव्या मंत्र्यांचाही केंद्रिय मंत्रीमंडळात समावेश करण्यात आला आहे. त्याच वेळी, अनुराग ठाकूर, राजीव चंद्रशेखर यांसारखे मागील सरकारचे मंत्री नरेंद्र मोदी ३.० मधील मंत्रिमंडळाचा भाग नाहीत.
भारतीय निवडणूक आयोगाने २३ ऑगस्ट २०२३ रोजी सचिन तेंडुलकरला तरुणांसाठी "नॅशनल आयकॉन" म्हणून मान्यता दिली. शहरी मतदारांना मतदानाबाबत जागरूक करण्यासाठी सचिनची निवड करण्यात आले होती.