अनेक वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आज (२२ जानेवारी) अयोध्येत श्री रामांची प्रतिष्ठापणा झाली. संपूर्ण देशात आज दिवाळीसारखे वातावरण आहे. सर्वजण राममय झाले आहेत. देश-विदेशातील लोक भगवान श्री रामांच्या भक्तीत तल्लीन झाले आहेत.
राम जन्मभूमी असलेल्या अयोध्या नगरीला हजारो क्विंटल फुलांनी सजवण्यात आले होते. सगळीकडे जल्लोषाचे वातावरण होते. रामलल्लाच्या प्रतिष्ठापणा सोहळ्यासाठी प्रत्येक क्षेत्रातील मान्यवर लोकांनी अयोध्येत उपस्थिती लावली होती. या सोहळ्यासाठी ८ हजार अतिमहत्वाच्या लोकांना निमंत्रण देण्यात आले होते.
पण ऐतिहासिक सोहळ्यादरम्यान अनेक महत्वाच्या व्यक्तींना काही अडचणींनादेखील सामारे जावे लागले. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या कारला पार्किंगसाठी बराच वेळ जागाच मिळाली नाही. त्यामुळे सचिनची कार बराचवेळ रस्त्यावर उभी राहिली.
वास्तविक, महत्वाच्या व्यक्तींसाठी पार्किंगची व्यवस्था पणजी टोला मोहल्ला आणि हनुमान कुंड या ठिकाणी केली होती.
तर सचिन तेंडुलकरकडे हनुमान कुंड येथील पार्किंगचा पास होता. पण त्याची कार पणजी टोला मोहल्ला येथील पार्किंगजवळ पोहोचली. यामुळे सचिनच्या कार पार्किंग मिळाली नाही. त्यामुळे सचिनची गाडी बराच वेळ रस्त्याच्या कडेला उभी राहिली.
अशा परिस्थितीत, ही माहिती अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली तेव्हा चांगलाच गोंधळ उडाला. यानंतर अधिकाऱ्यांनी सचिनच्या कारला पार्किंगची जागा उपलब्ध करून दिली.
भव्य राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होण्यासाठी अनेक बड्या व्यक्ती अयोध्येत पोहोचल्या आहेत. यात अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, रजनीकांत, संगीतकार शंकर महादेवन, माधुरी दीक्षित अयोध्येत पोहोचले होते. याशिवाय अभिनेत्री कंगना रणौत, शेफाली शाह, अभिनेता पवन कल्याण आणि रणदीप हुड्डा हे रविवारीच अयोध्येला पोहोचले होते.