Sachin Tendulkar Birthday : 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकर आज (२४ एप्रिल) आपला ५१ वा वाढदिवस साजरा करत आहे. सचिनने २०१३ मध्येच आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला असला तरी आजही जेव्हा तो स्टेडियममध्ये पाऊल ठेवतो तेव्हा चाहते 'सचिन-सचिन'चा जयघोष करायला विसरत नाहीत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतके झळकावणाऱ्या जगातील एकमेव फलंदाजाला वाढदिवसानिमित्त जगभरातील क्रिकेटरसिक शुभेच्छा देत आहेत.
माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंगने सचिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना लिहिले की, “वाढदिवसाच्या शुभेच्छा पाजी! मैदानावर गोलंदाजांची धुलाई करण्यापासून ते आयुष्यातील ध्येये साध्य करण्यापर्यंत, तुम्हीच आमचे प्रेरणास्रोत आहात. तुमच्यामुळे आम्ही उच्च ध्येय ठेवायला शिकलो. तुम्हाला खूप प्रेम देतो, चांगले आरोग्य राहो आणि नेहमी आनंदी राहा.”
यानंतर सुरेश रैनाने लिहिले, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पाजी तुमच्या शानदार कारकिर्दीने लाखो लोकांना प्रेरणा दिली आहे आणि तुमचा दयाळूपणा मैदानावर आणि मैदानाबाहेर मानके प्रस्थापित करत आहे. तुमच्या अद्भुत कव्हर ड्राईव्हप्रमाणेच तुम्हाला उत्तम आरोग्य आणि आनंदाच्या शुभेच्छा.”
प्रग्यान ओझा याने लिहिले, “पाजी तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! मी तुम्हाला उत्तम आरोग्य आणि आनंदी राहण्यासाठी शुभेच्छा देतो.”
BCCI चे सचिन जय शाह यांनी सचिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना लिहिले, “महान क्रिकेटर आज ५१ वर्षांचा झाला आहे. त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा! सचिनने जगभरातील लाखो लोकांना प्रेरित केले आहे.”
सचिन तेंडुलकरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये १८४२६ आणि कसोटी क्रिकेटमध्ये १५९२१ धावा केल्या आहेत. सचिनने १०० शतके झळकावली, ज्यामध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४९ शतके आणि कसोटी क्रिकेटमध्ये ५१ शतके आहेत.
सचिनने २०१३ मध्ये वानखेडे स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्धच्या २००व्या कसोटी सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तेंडुलकरने भारतासाठी ६६४ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ३४३५७ धावा केल्या आहेत.