Durban Super Giants vs Pretoria Capitals Highlights : दक्षिण आफ्रिका टी-20 लीगमधील दुसरा सामना डरबन सुपर जायंट्स आणि प्रिटोरिया कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. या सामन्याने थराराच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. या सामन्याचा निकाल शेवटच्या चेंडूवर लागला.
डरबनमधील किंग्समीड येथे झालेल्या या सामन्यात केन विल्यमसन याच्या नाबाद ६० आणि वियान मुल्डर याच्या १९ चेंडूत नाबाद ४५ धावांच्या जोरावर डरबनने २०९ धावा केल्या होत्या.
प्रत्युत्तरात प्रिटोरिया कॅपिटल्सने एकवेळ १३ षटकांत १ गडी गमावून १६८ धावा केल्या होत्या. त्यांना विजयासाठी शेवटच्या ४२ चेंडूत केवळ ४२ धावा करायच्या होत्या. अशा स्थितीत ते सहज सामना जिंकत असे वाटत होते, पण त्यांना शेवटच्या क्षणी दणका बसला आणि सामना दोन धावांनी गमवावा लागला.
२१० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना प्रिटोरिया कॅपिटल्सला विल जॅक ६४ आणि रहमानउल्ला गुरबाज ८९ यांनी चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी १५४ धावांची भागीदारी केली. गुरबाजने अवघ्या ४३ चेंडूंत ३ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने ८९ धावा केल्या. तर जॅकने ३५ चेंडूंच्या खेळीत ३ चौकार आणि ५ षटकार मारले.
हे दोघे बाद झाल्यानंतर कॅपिटल्सचा डाव गडगडला. त्यांना शेवटच्या ४२ चेंडूत ४२ धावाही करता आल्या नाहीत.
यादरम्यान कर्णधार रिली रॉसो १, सेनुरान मुथुसामी ८, लियाम लिव्हिंगस्टोन १३ आणि जेम्स नीशम ३ धावा करून बाद झाले. तर काईल व्हेरेन हा १० धावांवर नाबाद राहिला. प्रिटोरिया संघाला केवळ २०७ धावा करता आल्या, याचे कारण होते नवीन उल हक.
कॅपिटल्सची दुसरी विकेट १६९ धावांवर पडली आणि त्यानंतर संघाला गळती लागली. १९ षटकांत कॅपिटल्सने ६ गडी गमावून १९६ धावा केल्या होत्या. त्यांना शेवटच्या षटकात विजयासाठी १४ धावांची गरज होती.
मात्र, नवीनच्या तगड्या गोलंदाजीमुळे प्रिटोरिया कॅपिटल्सला हे करता आले नाही. नवीनने पहिल्या ५ चेंडूत १० धावा केल्या होत्या. शेवटच्या चेंडूवर कॅपिटल्सला ४ धावांची गरज होती आणि स्टीव्ह स्टॉल्क स्ट्राइकवर होता. पण त्याला केवळ १ धाव करता आली आणि प्रिटोरिया संघाने २ धावांनी सामना गमावला. नवीन-केशव महाराज यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. तर नूर अहमद आणि ख्रिस वोक्स यांना प्रत्येकी दोन विकेट मिळाले.
संबंधित बातम्या