दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मार्को यान्सेन याने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात एक महापराक्रम केला आहे. डरबनच्या किंग्समेड येथे झालेल्या कसोटीत यान्सेनने ११ विकेट घेतल्या.
यानंतर मार्को यान्सेन हा किंग्जमीड येथे कसोटीत १० किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेणारा चौथा गोलंदाज ठरला आहे. डर्बनमध्ये मार्को यान्सेन, ऑस्ट्रेलियाचा क्लेरेन्स ग्रिमेट, श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन आणि भारताचा व्यंकटेश प्रसाद यांनी १० बळी घेतले होते.
मार्को यान्सनने २८.३ षटकांत ८६ धावा देत ११ बळी घेतले, ही डरबनमधील दुसरी सर्वोत्तम कामगिरी आहे. फेब्रुवारी १९३६ मध्ये आफ्रिकेविरुद्ध ९३ षटकांत १७३ धावा देत १३ बळी घेणारा ग्रिमेट अव्वल स्थानी आहे.
मुरलीधरनने २००० मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १० विकेट्स घेतल्या होत्या, तर व्यंकटेश प्रसाद याने १९९६ मध्ये १० विकेट घेत यजमान संघाला अडचणीत आणले होते.
क्लेरेन्स ग्रिमेट- १३ विकेट, १९३६
मार्को जॅन्सन- ११ विकेट, २०२४
मुरलीधरन- १० विकेट्स, २०००
व्यंकटेश प्रसाद- १० विकेट १९९६
श्रीलंकेविरुद्धच्या विजयात मार्को यान्सेनने महत्त्वाची भूमिका बजावली. दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेचा २३३ धावांनी पराभव केला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने १-० अशी आघाडी घेतली आहे. यान्सनेने पहिल्या डावात केवळ १३ धावांच्या आत पाहुण्या संघाचे ७ बळी घेतले होते. तर दुसऱ्या डावातही त्याने श्रीलंकेच्या फलंदाजांना अडचणीत आणले.
या कसोटीत श्रीलंकेला विजयासाठी ५१६ धावांचे लक्ष्य होते. पण श्रीलंकेचा संघ दुसऱ्या डावात २८२ धावांवर ऑलआऊट झाला. संघाकडून दिनेश चंडीमलने सर्वाधिक ८३ धावांची खेळी केली. श्रीलंका पहिल्या डावात ४२ धावांवर गारद झाला होता.
यान्सेनने १४ टेस्टमध्ये २०.०५ च्या सरासरीने ६० विकेट्स घेतल्या आहेत, ज्यात त्याने दोन वेळा ५ विकेट्स घेतल्या आहेत. तर या महिन्याच्या सुरुवातीला सेंच्युरियनमधील सुपरस्पोर्ट पार्क येथे भारताविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात यान्सेनने १६ चेंडूत सर्वात जलद टी-२० आंतरराष्ट्रीय अर्धशतक झळकावले होते.