दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेतील दुसरा सामना केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात आफ्रिकेचा सलामीवीर रायन रिकल्टन याने द्विशतक केले आहे.
रिकल्टनच्या द्विशतकाच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात सर्वबाद ६१५ धावा केल्या. ८ वर्षानंतर आफ्रिकेच्या फलंदाजाने कसोटीत द्विशतक केले आहे.
रायन रिकेल्टनने ३४३ चेंडूत २५९ धावा केल्या तर काइल व्हेरेनने १४७ चेंडूत ९ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने १०० धावा केल्या. रिकेल्टनने आपल्या खेळीत २९ चौकार आणि ३ षटकार मारले.
या दोन फलंदाजांसोबतच आफ्रिकेकडून कर्णधार टेम्बा बावुमा यानेही १०६ धावांची खेळी केली. तर मार्को यान्सेनने झटपट ५४ चेंडूत ६२ धावा केल्या. पाकिस्तानकडून मोहम्मद अब्बास आणि सलमान आगा यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. तर मीर हमजा आणि खुर्रम शहजाद यांनी प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले.
हे वृत्त लिहिपर्यंत पाकिस्तानने पहिल्या डावात १ गडी बाद १८ धावा केल्या होत्या. बाबर आझम आणि कामरान गुलाम फलंदाजी करत होते.
पाकिस्तानविरुद्ध कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर रायन रिकल्टन याने द्विशतक झळकावत इतिहास रचला. या सलामीवीराने २६६ चेंडूत आपले द्विशतक पूर्ण केले. रिकल्टन हा २००८ नंतर आफ्रिकेसाठी सर्वात जलद द्विशतक करणारा फलंदाज ठरला आहे.
त्याआधी माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ याने बांगलादेशविरुद्ध २३८ चेंडूत द्विशतक झळकावले होते. हाशिम अमलानंतर या मैदानावर द्विशतक करणारा रिकल्टन पहिला फलंदाज ठरला आहे. अमलाने २०१६ मध्ये केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर इंग्लंडविरुद्ध द्विशतक केले होते.
दक्षिण आफ्रिका- एडन मार्कराम, रायन रिकेल्टन, विआन मुल्डर, ट्रिस्टन स्टब्स, टेम्बा बावुमा (कर्णधार), डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (विकेटकीपर), मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, क्वेना माफाका.
पाकिस्तान- शान मसूद (कर्णधार), सॅम अयुब, बाबर आझम, कामरान गुलाम, सय्यद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सलमान आगा, आमिर जमाल, मीर हमजा, खुर्रम शहजाद, मोहम्मद अब्बास
संबंधित बातम्या