South Africa vs Australia Semi-Final World Cup 2023 : क्रिकेट वर्ल्डकपच्या दुसऱ्या सेमी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेने विजयासाठी ऑस्ट्रेलियासमोर २१३ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ४९.४ षटकांत सर्व गडी गमावून २१२ धावा केल्या.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली. कर्णधार टेम्बा बावुमा पहिल्या षटकात बाद झाला. त्याला मिचेल स्टार्कने विकेटकीपर जोस इंग्लिसच्या हाती झेलबाद केले.
यानंतर दुसरा सलामीवीर क्विंटन डीकॉकदेखील ६व्या षटकात संघाच्या ८ धावा झाल्या असताना बाद झाला. क्विंटन डी कॉकला हेझलवूड कमिन्सने झेलबाद केले. त्याला १४ चेंडूत ३ धावा करता आल्या.
आफ्रिकेने २४ धावांच्या स्कोअरवर आपले टॉप ४ फलंदाज गमावले होते. अशा परिस्थितीत हेनरिक क्लासेन आणि डेव्हिड मिलर यांनी ९५ धावांची भागीदारी करत आफ्रिकेला १०० धावांच्या पुढे नेले. यानंतर ट्रॅव्हिस हेडने क्लासेन आणि मार्को यान्सेनला लागोपाठच्या चेंडूंवर बाद करत आफ्रिकन संघाला पुन्हा बॅकफूटवर आणले.
येथून डेव्हिड मिलरची जादू दिसून आली आणि त्याने एकट्याने दक्षिण आफ्रिकेला २१२ धावांपर्यंत पोहोचवले. डेव्हिड मिलरने ११६ चेंडूंचा सामना करत १०१ धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून ८ चौकार आणि ५ षटकार आले. याशिवाय हेनरिक क्लासेनने ४८ चेंडूंत ४ चौकार आणि २ षटकारांसह ४७ धावा केल्या. शेवटी गेराल्ड कोइट्झने १९ धावा केल्या. मार्कराम आणि रबाडाने प्रत्येकी १० धावांचे योगदान दिले.
ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्सने प्रत्येकी ३ बळी घेतले. जोश हेझलवूड आणि ट्रॅव्हिस हेडने प्रत्येकी २ गडी बाद केले. आता ऑस्ट्रेलियाला अंतिम फेरी गाठण्यासाठी २१३ धावांची गरज आहे.
संबंधित बातम्या