मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  CSK Ruturaj Gaikwad: चेन्नई सुपर किंग्सची धुरा मराठी शिलेदाराकडे; धोनीच्या जागी ऋतुराज गायकवाड याची वर्णी

CSK Ruturaj Gaikwad: चेन्नई सुपर किंग्सची धुरा मराठी शिलेदाराकडे; धोनीच्या जागी ऋतुराज गायकवाड याची वर्णी

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Mar 21, 2024 05:21 PM IST

CSK new captain ruturaj gaikwad : चेन्नई सुपर किंग्स संघाच्या कर्णधारपदी ऋतुराज गायकवाड याची निवड करण्यात आली आहे.

चेन्नई सुपरकिंग्सची धुरा मराठी शिलेदाराकडे; धोनीच्या जागी ऋतुराज गायकवाड याची वर्णी
चेन्नई सुपरकिंग्सची धुरा मराठी शिलेदाराकडे; धोनीच्या जागी ऋतुराज गायकवाड याची वर्णी

Ruturaj Gaikwad to lead CSK in IPL 2024 : मागील काही वर्षांत क्रिकेटच्या मैदानावर विशेषत: आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणारा मराठमोळा फलंदाज ऋतुराज गायकवाड याच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. आयपीएलमधील सर्वाधिक यशस्वी संघ असलेल्या चेन्नई सुपर किंग्स संघाच्या कर्णधारपदी ऋतुराजची निवड करण्यात आली आहे.

आयपीएलच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून ही माहिती देण्यात आली आहे. इंडियन प्रीमियर लीगचा (IPL 2024) नवा सीझन सुरू होण्यास अवघे काही दिवस असतानाच महेंद्रसिंह धोनीनं कर्णधारपदाच्या राजीनाम्याचा बॉम्ब टाकला. त्या धक्क्यातून सावरत संघ व्यवस्थापनानं लगेचच भारतीय संघाचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड याची यंदाच्या मोसमासाठी कर्णधारपदी निवड केली आहे.

भारतीय क्रिकेटवर स्वत:चा ठसा उमटवणारा एमएस धोनी हा करिअरच्या शेवटच्या टप्प्यात आहे. या स्पर्धेच्या सलामीच्या सामन्याआधीच त्यानं राजीनामा दिला आहे. ही आयपीएल ४२ वर्षीय धोनीची शेवटची स्पर्धा असेल. आयपीएल २०२२ च्या स्पर्धेच्या आधी देखील धोनीनं सीएसकेच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. त्याच्या जागी अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजाकडं संघाचं नेतृत्व देण्यात आलं होतं. मात्र, संघाच्या खराब कामगिरीमुळं पुन्हा एकदा धोनीनं सूत्रं हाती घेतली होती.

धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसकेनं जोरदार पुनरागमन केलं आणि आयपीएल स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. धोनीच्या कुशल नेतृत्वाखाली सीएसकेनं आयपीएलची पाच विजेतेपदं पटकावली आहेत.

दोन वर्षांपूर्वीच मिळाले होते संकेत

ऋतुराज गायकवाडला क्रिकेटच्या सर्वच फॉरमॅटचा अनुभव आहे. कसोटी क्रिकेटही तो खेळला आहे. आयपीएल स्पर्धेमुळं तो खऱ्या अर्थानं घराघरात पोहोचला. २०२१ च्या आयपीएल सीझनमध्ये ऋतुराजनं सीएसकेकडून खेळताना सर्वाधिक ६३५ धावा कुटल्या होत्या. त्याच्या कामगिरीनं धोनीही प्रभावित झाला होता. तेव्हाच २७ वर्षीय ऋतुराजला पुढील मोठ्या जबाबदारीचे संकेत देण्यात आले होते. 

क्रिकेटच्या मैदानावरील त्याची कामगिरी सातत्यपूर्ण राहिली आहे. त्यामुळं चेन्नई संघातील तो एक भरवशाचा व प्रमुख खेळाडू बनला आहे. आयपीएलमधील त्याच्या कामगिरीमुळं भारताच्या एकदिवसीय संघातही त्याला स्थान मिळालं आहे. त्यानं आतापर्यंत ६ वनडे आणि १९ टी-२० सामने खेळले आहेत. आयपीएलमधील ५२ सामन्यांत ३९.०६ च्या सरासरीनं आणि १३५.५२ च्या स्ट्राइक रेटनं त्यानं १७९७ धावा केल्या आहेत.

WhatsApp channel