बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील वरिष्ठ निवड समितीने रविवारी (८ सप्टेंबर) पहिल्या कसोटी सामन्यासाठी संघाची घोषणा केली. वेगवान गोलंदाज यश दयाल याला या संघात प्रथमच स्थान मिळाले आहे.
आकाशदीपही संघात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला आहे, मात्र चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाड संघात स्थान मिळवण्यात अपयशी ठरला आहे.
गायकवाड सध्या दुलीप ट्रॉफीमध्ये इंडिया-सी संघाचे नेतृत्व करत आहे. या सामन्याच्या दुसऱ्या डावात गायकवाडने ४८ चेंडूंचा सामना करताना ४६ धावा केल्या होत्या. त्याच्या खेळीत ८ चौकारांचा समावेश होता. त्याच्या खेळीने इंडिया-डी विरुद्ध इंडिया-सीच्या विजयाचा पाया रचला होता.
ऋतुराज गायकवाड याची प्रथम श्रेणी क्रिकेटची आकडेवारीही चांगली आहे. त्याची येथे सरासरी ४२.६९ आहे. त्याने भारतासाठी टी-20 आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे, परंतु अद्याप त्याला कसोटीत संधी मिळालेली नाही. गायकवाड सलामीवीर असून रोहित शर्मासोबत यशस्वी जैस्वाल सलामीवीर म्हणून जबाबदारी पार पाडत आहे. तिसऱ्या क्रमांकावर शुभमन गिल आहे जो सलामीवीरासाठी बॅकअप आहे.
रोहित कर्णधार असून तो फॉर्मात आहे. जैस्वालने इंग्लंडविरुद्धच्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत ७०० हून अधिक धावा केल्या होत्या. त्यामुळे त्याची जागाही निश्चित झाली आहे. अशा स्थितीत गायकवाड यांचे संघात स्थान निर्माण होत नाही.
ऋतुराज गायकवाडला संघात न घेतल्याने चाहते संतापले आहेत. गायकवाड याची निवड न केल्याने चाहत्यांनी निवड समितीला जाब विचारला आहे. गायकवाड हा महाराष्ट्राचा संजू सॅमसन असल्याचे काही चाहत्यांचे म्हणणे आहे.
संजूलाही टीम इंडियामध्ये सातत्यपूर्ण संधी मिळत नाही आणि त्याकडेही दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे गायकवाड यांची तुलना संजूशी करण्यात आली आहे. काही चाहत्यांनी याला गायकवाडसोबत राजकारण होत असल्याचे म्हटले आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाशदीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल.
पहिला कसोटी सामना - १९ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर, सकाळी ९.३०, चेन्नई
दुसरा कसोटी सामना - २७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर, सकाळी ९.३०, कानपूर
पहिला T20 सामना - ६ ऑक्टोबर, संध्याकाळी ७ वाजता, धर्मशाला
दुसरा T20 सामना - ९ ऑक्टोबर, संध्याकाळी ७ वाजता, दिल्ली
तिसरा T20 सामना - १२ ऑक्टोबर, संध्याकाळी ७ वाजता, हैदराबाद