Ruturaj Gaikwad Net Worth : टीम इंडियाचा फलंदाज आणि चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत खूप काही मिळवले आहे. आता तो फक्त भारताची कसोटी जर्सी मिळण्याची वाट पाहत आहे. तो टीम इंडियासाठी निळ्या जर्सीत खेळला असून त्याने आयपीएलमध्येही खूप धमाल केली आहे. ऋतुराज गायकवाडने वयाच्या २६ व्या वर्षी त्याची मैत्रीण उत्कर्षा पवार हिच्याशी लग्न केले.
आज (३१ जानेवारी) ऋतुराज गायकवाड त्याचा २८ वा वाढदिवस साजरा करत आहे. ऋतुराज गायकवाड याचा जन्म ३१ जानेवारी १९९७ रोजी पुणे येथे झाला. त्याचे वडील रथ गायकवाड हे DRDO मधील वरिष्ठ पदावरून निवृत्त झाले आहेत. तर ऋतुराजची आई सविता गायकवाड या पालिका शाळेत शिक्षिका आहेत.
ऋतुराज गायकवाड याने सेंट जोसेफ शाळेतून शालेय शिक्षण घेतले. बारावीनंतर त्याने मराठवाडा मित्र मंडळाच्या महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेतले. या दरम्यान त्याच्या कुटुंबीयांनी त्याला क्रिकेट खेळण्यापासून कधीच रोखले नाही.
ऋतुराजने भारतासाठी ६ एकदिवसीय आणि १९ टी-20 सामने खेळले आहेत. गायकवाडने २०२० मध्ये सीएसकेकडून पदार्पण केले आणि आतापर्यंत ६६ सामन्यांमध्ये तो संघाचा भाग राहिला आहे.
ऋतुराजला लहानपणापासूनच क्रिकेट खेळण्याची खूप आवड होती. वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी त्याने पिंपरी-चिंचवड येथील दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमीमध्ये प्रवेश घेतला. ऋतुराजने वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी २०१६-१७ रणजी ट्रॉफीमध्ये महाराष्ट्रासाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि फेब्रुवारी २०१७ मध्ये विजय हजारे ट्रॉफीमध्ये महाराष्ट्रासाठी लिस्ट ए मध्ये पदार्पण केले.
२०१९ च्या आयपीएल लिलावात चेन्नई सुपर किंग्जने गायकवाडला २० लाख रुपयांच्या मूळ किमतीत विकत घेतले, परंतु संपूर्ण हंगामात त्याला पदार्पण करण्याची संधी मिळाली नाही आणि तो बेंचवरच बसून राहिला.
यानंतर आयपीएल २०२० मध्ये, त्याला राजस्थान रॉयल्सविरुद्ध पदार्पण करण्याची संधी मिळाली आणि पदार्पणाच्या सामन्यात तो शून्यावर बाद झाला. गायकवाडने त्या मोसमात ६ सामने खेळले आणि ४ डावात तीन अर्धशतकांसह एकूण २०४ धावा केल्या. गायकवाडचा प्रवास जसजसा पुढे जात होता, तसतसे त्यांच्या वाटेला मोठ्या संधी येत राहिल्या.
आयपीएलच्या २०२१ हंगामात गायकवाडला फाफ डू प्लेसिससह चेन्नईसाठी सलामीची संधी मिळाली आणि त्यानंतर ऋतुराजने मागे वळून पाहिले नाही. ऋतुराज आयपीएल २०२१ मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. त्याने १६ डावात १३६.२६ च्या स्ट्राईक रेटने एकूण ६३५ धावा केल्या होत्या ४ अर्धशतके आणि १ शतक झळकावले. ऋतुराजला 'इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर'चा पुरस्कारही मिळाला होता.
ऑरेंज कॅप जिंकणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरला होता, परंतु नंतर शुभमन गिलने हा विक्रम आपल्या नावे केला.
इंडियन प्रीमियर लीग २०२४चा हंगाम २२ मार्चपासून सुरू होणार होता. पण त्याच्या एक दिवस आधी चेन्नई सुपर किंग्सने एक मोठा बदल करून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. महेंद्रसिंह धोनीच्या जागी २७ वर्षीय ऋतुराज गायकवाडकडे CSK संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आल होते. यानंतर २०२४ मध्येही तो चांगल्या फॉर्मात होता, कर्णधार म्हणून त्याने १४ डावांत एका शतकासह ५८३ धावा केल्या होत्या.
ऋतुराज गायकवाड याची नेट वर्थ करोडोंमध्ये आहे. त्याला आयपीएल २०२५ साठी १८ कोटी रुपये मिळणार आहेत. स्पोर्ट्सकीडानुसार त्याची एकूण संपत्ती ३०-३६ कोटी रुपये आहे.
क्रिकेटसोबत तो ब्रँड एंडोर्समेंट आणि जाहिरातींमधूनही मोठी कमाई करतो. ऋतुराज गायकवाड याचे पुण्यात एक आलिशान अपार्टमेंट असून, त्याची अंदाजे किंमत ८ कोटी रुपये आहे. हे घर सोमेश्वरवाडीत आहे. तर त्याच्या कार कलेक्शनमध्ये अनेक आलिशान गाड्या आहेत. त्याच्या कार कलेक्शनमध्ये ऑडी आणि बीएमडब्ल्यू एम८ सारख्या कार आहेत.
संबंधित बातम्या