India vs Australia: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात शुक्रवारी रायपूर येथे चौथा टी-२० सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवत मालिका खिशात घातली. या सामन्यात भारताचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने खास विक्रमाला गवसणी घातली. टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद ४ हजार धावांचा टप्पा गाठणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने अवघ्या ११६ डावांत ही कामगिरी बजावली आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड केएल राहुलच्या नावावर होता. त्याने ११७ डावांत ४ हजार टी-२० धावा पूर्ण केल्या होत्या.
ऋतुराजने आतापर्यंत खेळलेल्या टी-२० सामन्यांमध्ये एकूण ५ शतके झळकावली आहेत. मागच्या सामन्यातही त्याने शानदार शतक झळकावले होते. रुतुराजची टी-२० क्रिकेटमध्ये फलंदाजीची सरासरी ३८+ आणि स्ट्राइक रेट १३९+ आहे. आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात ऋतुराज गायकवाडच्या नावावर ४५०+ धावांची नोंद आहे. त्याची आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये फलंदाजीची सरासरी ३८+ आणि स्ट्राइक रेट १४४+ आहे.
ऋतुराज गायकवाडने जुलै २०२१ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याच्या करिअरची सुरुवात टी-20 सामन्याने झाली. हा सामना यजमान श्रीलंकेविरुद्ध कोलंबोमध्ये खेळला गेला. आपल्या अडीच वर्षांच्या छोट्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत गायकवाडला केवळ १८ टी-२० सामने खेळण्याची संधी मिळाली. नियमितपणे कामगिरी करू न शकल्यामुळे आणि दुखापतीमुळे संघाबाहेर गेला.
या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात आघाडी घेतल्यानंतर तिसऱ्या सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र, त्यानंतर चौथा सामना जिंकून भारताने मालिकेत ३-१ अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील पाचवा आणि अखेरचा टी-२० सामना रविवारी बंगळुरु येथे खेळला जाईल.
संबंधित बातम्या