IPL LSG vs CSK : आयपीएल २०२४ मधील ३४ वा सामना शुक्रवारी लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात लखनऊच्या एकना स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यातील स्लो ओव्हर रेटमुळं दोन्ही संघांचे कर्णधार केएल राहुल आणि ऋतुराज गायकवाड यांना प्रत्येकी १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएल २०२४ मध्ये एका सामन्यात दोन्ही कर्णधारांना दंड ठोठावला जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.
केएल राहुल आणि ऋतुराज गायकवाड या दोन्ही कर्णधारांची ही पहिलीच चूक असल्यानं त्यांना हा दंड ठोठावण्यात आला आहे. त्यांनी ही चूक पुन्हा केल्यास दंडाची रक्कम वाढवली जाईल, तर तिसऱ्यांदा असं केल्यास दोन्ही कर्णधारांना प्रत्येकी एका सामन्याच्या बंदीला सामोरं जावं लागू शकतं.
चालू स्पर्धेत षटकांची गती कमी राखल्यामुळं ऋषभ पंत याला याआधी दोनदा दंड ठोठावण्यात आला आहे. तर, संजू सॅमसन, शुभमन गिल आणि हार्दिक पंड्याला प्रत्येकी एकदा दंड ठोठावण्यात आला आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) या संदर्भात प्रसिद्धी पत्रक काढलं आहे. आयपीएल आचारसंहितेनुसार दोन्ही कर्णधारांवर ही कारवाई करण्यात आल्याचं पत्रकात म्हटलं आहे. लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्सचा आयपीएल २०२४ मधील ही पहिलीच चूक आहे. त्यामुळं दोन्ही कर्णधारांना प्रत्येकी १२ लाखांचा दंड करण्यात आलाय. ही चूक त्यांनी पुन्हा केल्यास प्रत्येकी २४ लाख रुपयांचा दंड आकारला जाईल आणि संघातील इतर खेळाडूंनाही शिक्षा भोगावी लागेल. दोन्ही संघातील उर्वरित खेळाडूंना ६ लाख रुपये किंवा मॅच फीच्या २५ टक्के रक्कम (यापैकी जी कमी असेल) दंड म्हणून आकारली जाईल.
संघांनी तिसऱ्यांदा ही चूक केली तर कर्णधारांवर प्रत्येकी ३० लाख रुपयांच्या दंडासह एका सामन्यासाठी बंदी घालण्यात येईल आणि संघातील उर्वरित खेळाडूंना (कर्णधार वगळता) प्रत्येकी १२ लाख रुपये किंवा त्यांच्या मॅच फीच्या ५० टक्के (यापैकी जी कमी असेल) दंड आकारला जाईल.
आयपीएल २०२४ ची प्राथमिक फेरी जवळपास संपली असून आता प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी संघांमध्ये जोरदार चुरस आहे. दावेदार अनेक असल्यामुळं संघांवर दबाव वाढत चालला आहे. संघांना त्यांची षटके पूर्ण करण्यासाठी लागत असलेल्या वेळावरूनच याचा अंदाज बांधता येऊ शकतो.