Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals, Qualifier 2 : इंडियन प्रीमियर लीग २०२४ चा दुसरा क्वालिफायर सामना राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. या सामन्यात हैदराबादने राजस्थानचा ३६ धावांनी धुव्वा उडवत फायनलध्ये एन्ट्री केली.
या सामन्यात राजस्थानसमोर विजयासाठी १७६ धावांचे लक्ष्य होते, पण ते ७ विकेट्सवर १३९ धावाच करू शकले. आता २६ मे रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यात सनरायझर्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी (KKR) होणार आहे. कोलकाताने पहिल्या क्वालिफायरमध्ये हैदराबादचा पराभव करूनच अंतिम फेरी गाठली होती.
१७६ धावांचा पाठलाग करताना राजस्थानने पॉवरप्लेमध्ये एका विकेटच्या मोबदल्यात ५१ धावा केल्या होत्या. राजस्थानची धावसंख्या एका वेळी १ बाद ६५ धावा अशी होती, पण त्यानंतर डावखुरा फिरकीपटू शाहबाज अहमद आणि अभिषेक शर्मा यांनी एकत्रितपणे सामना फिरवला.
शाहबाजने यशस्वी जैस्वाल, रियान पराग आणि आर. अश्विन बाद यांना बाद केले. तर अभिषेकने संजू सॅमसन आणि शिमरॉन हेटमायरची विकेट घेतली. ध्रुव जुरेलने ३५ चेंडूत नाबाद ५६ धावा करत राजस्थानला सामन्यात परत नेण्याचा नक्कीच प्रयत्न केला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
ज्युरेलने नाबाद खेळीत ७ चौकार आणि २ षटकार मारले. यशस्वीने २१ चेंडूंत ४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ४२ धावा केल्या.
अशाप्रकारे राजस्थानचा संघ २० षटकांत केवळ १३९ धावा करू शकला. हैदराबादकडून शाहबाज अहमदने ३ आणि अभिषेक शर्माने २ बळी घेतले. शाहबाजने ४ षटकात २४ तर अभिषेकने ४ षटकात २३ धावा दिल्या. आता या मैदानावर २६ मे रोजी कोलकाता आणि हैदराबाद यांच्यात अंतिम सामना होणार आहे.
तत्पूर्वी, सनरायझर्स हैदराबादने २० षटकात ९ गडी गमावून १७५ धावा केल्या. हैदराबादकडून हेन्रिक क्लासेनने सर्वाधिक ५० धावा केल्या. तर राहुल त्रिपाठीने ३७ धावांची तर ट्रॅव्हिस हेडने ३४ धावांची खेळी केली. हैदराबादने पुन्हा एकदा झंझावाती सुरुवात केली, पण ठराविक अंतराने विकेट गमावल्यामुळे मोठी धावसंख्या होऊ शकली नाही.