IPL 2024: राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात शनिवारी आयपीएलचा १९वा सामना खेळला जाईल. खराब फॉर्मशी झुंजत असलेले रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या सामन्यात चांगली कामगिरी करण्याची आशा आहे. तर, या स्पर्धेत दमदार कामगिरी करणारा राजस्थानचा संघ आपली विजयी घौडदौड कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. बंगळुरूकडे कर्णधार फाफ डुप्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन आणि रजत पाटीदार यांसारखे उत्कृष्ट आक्रमक फलंदाज आहेत. परंतु कोणीही चांगली कामगिरी करू शकले नाही. बंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहलीने दोन अर्धशतकांसह २०३ धावा केल्या आहे आणि मानाची ऑरेंज कॅप त्याच्याकडेच आहे. पण त्याला संघातील इतर खेळाडूकडून साथ मिळाली नाही.
पाटीदारने लखनौ सुपरजायंट्सविरुद्ध २९ धावा केल्या, पण त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. सवाई मानसिंग स्टेडियमची खेळपट्टी आरसीबीच्या होम ग्राउंड चिन्नास्वामी स्टेडियमसारखीच आहे. या खेळपट्टी फलंदाजांना फटके खेळण्यास सोपे जाईल.दुसरीकडे, राजस्थानचे सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि जोस बटलर चांगल्या फॉर्ममध्ये नाहीत. यशस्वीला तीन सामन्यांत केवळ ३९ धावा करता आल्या. तर, बलटरने त्याच्या तीन सामन्यात ३५ धावा केल्या आहेत.
कर्णधार संजू सॅमसन (१०९ धावा) आणि रायन पराग (१८१ धावा) हे राजस्थानच्या फलंदाजीचा कणा आहे. राजस्थानने गोलंदाजीत वरचष्मा दाखवला आहे. अनुभवी लेगस्पिनर युझवेंद्र चहल व्यतिरिक्त वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट आणि आंद्रे बर्जर गोलंदाजीत चांगली कामगिरी करीत आहेत. या तिघांनी मिळून १६ विकेट घेतल्या आहेत. पण अनुभवी रविचंद्रन अश्विनने मात्र तीन सामन्यांत एकच विकेट मिळवता आली आहे. दुसरीकडे बंगळुरूसाठी मोहम्मद सिराज महागडा गोलंदाज ठरला आहे. याशिवाय, अल्झारी जोसेफ आणि रीस टोपली यांनीही आपल्या क्षमतेनुसार कामगिरी केलेली नाही.
आयपीएलच्या इतिहासात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स ३० वेळा आमनेसामने आले. यापैकी १५ सामन्यात बंगळुरूने विजय मिळवला आहे. तर, राजस्थानने १२ सामने जिंकले आहेत. याशिवाय, एक सामना अनिर्णित ठरला. जयपूरच्या मानसिंह स्टेडियमवर दोन्ही संघ ८ वेळा एकमेकांशी भिडले. यात बंगळुरू आणि राजस्थानने प्रत्येकी चार-चार सामने जिंकले आहेत.
संबंधित बातम्या