IPL 2024: राजस्थान रॉयल्सविरुद्ध सोमवारी (२२ एप्रिल २०२३) खेळल्या गेलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाला ९ विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या मुंबईच्या संघाने २० षटकात ९ विकेट्स गमावून १७९ धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थानने १८.४ षटकांत १ विकेट गमावून लक्ष्य गाठले. या पराभवानंतर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याने आपले मत व्यक्त केले.
हार्दिक पांड्या म्हणाला की, "सुरुवातीला सतत विकेट गमावल्यानंतर आम्ही १८० धावांचा विचार केला नव्हता, त्यावेळी ही धावसंख्या अवघड वाटत होती. या सामन्यात १०-१५ धावा कमी पडल्या. यानंतर आमचे गोलंदाज लाईन आणि लेन्थवर गोलंदाजी करण्यास अपयशी ठरले. पॉवरप्ले मध्ये आम्ही अधिक धावा खर्च केल्या. मला असे वाटते की आज आम्ही आमचे सर्वोत्तम देण्यास अपयशी ठरलो. आमची फिल्डिंगही खराब झाली. एकूणच आम्ही चांगली कामगिरी करू शकलो नाही, त्यामुळे पराभवाला सामोरे जावे लागले.या पराभवानंतर सर्व खेळाडूंशी बोलण्याची गरज आहे असे मला वाटत नाही, सर्व खेळाडू प्रोफेशनल आहेत, प्रत्येकाला त्यांची भूमिका चांगली माहिती आहे. या पराभवानंतर आम्ही आमच्या चुकांमधून धडा घेण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून या चुकांची पुनरावृत्ती टाळता येईल. आम्ही आमच्या कमतरतांवर काम करू".
या सामन्यात नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सच्या संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. युवा फंलदाज तिलक वर्माचे तुफानी अर्धशतक (४५ चेंडू ६५ धावा) आणि नेहाल वढेराच्या ४९ धावांच्या जोरावर मुंबईच्या संघाने २० षटकात ९ विकेट्स गमावून १७९ धावांपर्यंत मजल मारली. राजस्थानकडून संदीप शर्माने सर्वाधिक पाच विकेट्स घेतल्या. तर, ट्रेन्ट बोल्टने दोन आणि चहलच्या खात्यात एक विकेट जमा झाली. यानंतर सलामीवीर यशस्वी जैस्वालच्या (नाबाद १०४ धावा) शतकी खेळीच्या जोरावर राजस्थानने १८.४ षटकात हा सामना जिंकला. मुंबईकडून पियुष चावलाने एक विकेट घेतली.
या हंगामात मुंबई इंडियन्सची खराब सुरुवात झाली. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स आठ पैकी तीन सामने जिंकले आहेत. तर, पाच सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. आयपीएल २०२४ च्या गुणतालिकेत मुंबईचा संघ ६ गुणांसह सातव्या स्थानावर आहे.
संबंधित बातम्या