मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  RR Vs DC Highlights : राजस्थानच्या गोलंदाजांची जबरदस्त कामगिरी, दिल्ली कॅपिटल्सचा सलग दुसरा पराभव

RR Vs DC Highlights : राजस्थानच्या गोलंदाजांची जबरदस्त कामगिरी, दिल्ली कॅपिटल्सचा सलग दुसरा पराभव

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 28, 2024 11:31 PM IST

RR Vs DC IPL 2024 Highlights : राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्सचा १२ धावांनी पराभव केला आहे. हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला गेला.

RR Vs DC IPL 2024 Highlights
RR Vs DC IPL 2024 Highlights (ANI)

संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स (RR) इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२४ मध्ये विजयरथावर स्वार आहे. राजस्थानने सलग दुसरा सामना जिंकला आहे. गुरुवारी (२८ मार्च) जयपूर येथे झालेल्या सामन्यात राजस्थानने दिल्ली कॅपिटल्सचा (DC) १२ धावांनी पराभव केला. ऋषभ पंतचा दिल्लीसाठी हा १०० वा सामना होता.

राजस्थानचा हा सलग दुसरा विजय आहे, तर दिल्ली कॅपिटल्सचा सलग दुसरा पराभव आहे. दिल्लीला शेवटच्या षटकात विजयासाठी १७ धावा करायच्या होत्या, पण आवेश खानने अप्रतिम गोलंदाजी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. दिल्लीसाठी ट्रिस्टन स्टब्सने २३ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ४४ धावा केल्या, मात्र तो आपल्या संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही.

तत्पूर्वी, १८६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात धमाकेदार सुरुवात केली होती. पण त्यानंतर ऋषभ पंत आणि मधल्या फळीतील फलंदाजांना धावांची गती कायम राखता आली नाही. परिणामी त्यांना सामना गमवावा लागला. 

दिल्ली कॅपिटल्सला २० षटकात ५ बाद १७३ धावाच करता आल्या. दिल्लीकडून सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने ४९ आणि ट्रिस्टन स्टब्सने नाबाद ४४ धावा केल्या. कर्णधार ऋषभ पंतला केवळ २६ चेंडूत २८ धावा करता आल्या.

राजस्थानचा डाव

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थान संघाची सुरुवात खूपच खराब झाली. संघाने केवळ ३६ धावांत ३ विकेट गमावल्या होत्या. यशस्वी जैस्वाल (५), कर्णधार संजू सॅमसन (१५) आणि जोस बटलर (११) लवकर बाद झाले. यानंतर रियान पराग आणि आर अश्विन (२९) यांनी डाव सांभाळला. दोघांमध्ये ३७ चेंडूत ५४ धावांची भागीदारी झाली.

परागने ३४ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. तसेच ध्रुव जुरेल (२०) सोबत २३ चेंडूत ५२ धावांची भागीदारी केली. शेवटी परागने ४५ चेंडूत नाबाद ८४ धावांची सर्वोच्च खेळी खेळली.

परागसह शिमरॉन हेटमायरने १६ चेंडूत ४३ धावा जोडल्या. अशा प्रकारे राजस्थानची धावसंख्या ५ गड्यांच्या मोबदल्यात १८५ धावांपर्यंत पोहोचली. दिल्ली संघाकडून खलील अहमद, कुलदीप यादव, अक्षर पटेल, एनरिक नॉर्खिया आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.

IPL_Entry_Point