इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2024 ) १७व्या हंगामातील १०व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ७ विकेट्सनी पराभव केला. बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर शुक्रवारी (२९ मार्च) झालेल्या सामन्यात केकेआरला विजयासाठी १८३ धावांचे लक्ष्य होते. हे लक्ष्य त्यांनी १६.१ षटकात पूर्ण केले.
कोलकाता नाईट रायडर्सचा हा सलग दुसरा विजय ठरला आहे. केकेआरने पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा ४ धावांनी पराभव केला होता. आरसीबीचा ३ सामन्यांतील हा दुसरा पराभव ठरला.
१८४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सुनील नरेन आणि फिल सॉल्टने कोलकाता नाईट रायडर्सला दमदार सुरुवात करून दिली. दोघांनी अवघ्या ३९ चेंडूत ८६ धावांची भागीदारी केली. नरेनने २२ चेंडूत ५ षटकार आणि २ चौकारांसह ४७ धावा केल्या. तर सॉल्टने २० चेंडूंत दोन चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ३० धावा केल्या.
सॉल्ट-नरेननंतर व्यंकटेश अय्यरची जादू पाहायला मिळाली. व्यंकटेश अय्यरने झंझावाती अर्धशतक झळकावून आरसीबीला सामन्यातून पूर्णपणे बाहेर फेकले. व्यंकटेश अय्यरने ३० चेंडूंत ३ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ५० धावा केल्या. कर्णधार श्रेयस अय्यर ३९ आणि रिंकू सिंग ५ धावांवर नाबाद राहिला.
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या आरसीबीची सुरुवात चांगली झाली नाही आणि १७ धावांवर कर्णधार फाफ डू प्लेसिसची (८) विकेट गमावली. यानंतर विराट कोहली आणि कॅमेरून ग्रीन यांनी मिळून दुसऱ्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी केली.
पण आंद्रे रसेलने ग्रीनला बोल्ड करत ही भागीदारी संपुष्टात आणली. ग्रीनने ४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ३३ धावा केल्या. ग्रीन बाद झाल्यानंतर काही वेळातच कोहलीने ३६ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.
शेवटी दिनेश कार्तिकही बरसला. कार्तिकने अवघ्या ८ चेंडूत ३ षटकारांच्या मदतीने २० धावा केल्या. केकेआरचा मिचेल स्टार्क पुन्हा एकदा चांगलाच महागात पडला. स्टार्कने चार षटकात एकही विकेट न घेता ४७ धावा दिल्या.