इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2024) २०व्या सामन्यात आज (७ एप्रिल) मुंबई इंडियन्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होत आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर मुंबई प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ५ बाद २३४ धावा ठोकल्या.
दरम्यान, मुंबईच्या डावाचा हिरो ठरला तो वेस्ट इंडिजचा ऑलराऊंडर रोमारियो शेफर्ड. शेवटच्या दोन षटकात फलंदाजीसाठी आलेल्या शेफर्डने वानखेडेवर धुमाकूळ घातला. मुंबईच्या शेवटच्या षटकात ३२ धावा चोपल्या. दिल्लीसाठी हे षटक त्यांचा सर्वोत्तम गोलंदाज एनरिक नॉर्खियाने टाकले.
तत्पूर्वी, १९व्या षटकापर्यंत मुंबई इंडियन्सची धावसंख्या ५ बाद २०२ धावा होती. यानंतर डावातील शेवटचे षटक टाकण्यासाठी आलेल्या एनरिक नोर्खियाच्या पहिल्याच चेंडूवर रोमॅरियो शेफर्डने चौकार ठोकला. यानंतर शेफर्डने ओव्हरच्या पुढील ३ चेंडूंवर सलग ३ षटकार ठोकले. त्यानंतर शेफर्डने पाचव्या चेंडूवर चौकार आणि सहाव्या चेंडूवर षटकार मारला.
यासह शेफर्डने या षटकात २ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने एकूण ३२ धावा केल्या. या सोबतच हे आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिाहासातील दुसरे सर्वात महागडे षटक ठरले आहे. रोमारियो शेफर्डने या सामन्यात १० चेंडूत ३९ धावा ठोकल्या. ज्यामध्ये त्याने एकूण ३ चौकार आणि ४ षटकार मारले.
रवींद्र जडेजा – ३६ धावा (वि. आरसीबी)
रोमारियो शेफर्ड - ३२ धावा (वि दिल्ली कॅपिटल्स)
रिंकू सिंग - ३० धावा (गुजरात टायटन्स)
हार्दिक पांड्या - २८ धावा (रायझिंग पुणे सुपरजायंट्स)
श्रेयस अय्यर - २८ धावा (कोलकाता नाइट रायडर्स)
या सामन्यात रोहित शर्मा आणि इशान किशन या सलामीच्या जोडीने मुंबई इंडियन्स संघाला शानदार सुरुवात करून दिली आणि पहिल्या विकेटसाठी ७५ धावांची भागीदारी केली, याच्या जोरावर मुंबईला २०० हून अधिक धावा करण्यात यश आले.
त्याच वेळी, मुंबईने आता आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा २०० पेक्षा जास्त धावा करण्याच्या बाबतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची बरोबरी केली आहे, ज्यामध्ये दोघांनी २४-२४ वेळा ही कामगिरी केली आहे. या यादीत चेन्नई सुपर किंग्ज संघ पहिल्या स्थानावर आहे. त्यांनी २९ वेळा आयपीएलमध्ये २०० हून अधिक धावा केल्या आहेत.
संबंधित बातम्या