
India vs England 2nd Test Day 4, Vizag : भारत आणि इंग्लंड यांच्यात विशाखापट्टणम येथे दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे.आज (५ फेब्रुवारी) सामन्याचा चौथा दिवस आहे. इंग्लंडसमोर विजयासाठी ३९९ धांवाचे लक्ष्य आहे.
दरम्यान, आजच्या दिवसाच्या पहिल्या सत्रात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने स्लीपमध्ये एक अप्रतिम झेल घेतला. हा झेल इंग्लंडचा भरवशाचा फलंदाज ओली पोपचा होता, हा झेल सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो.
वास्तविक, कसोटीच्या चौथ्या दिवशी इंग्लंड भारताच्या ३९९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी फलंदाजीसाठी उतरला. या वेळी ऑली पोप संघाकडून चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. पोपने चांगली सुरुवात केली. मात्र तो फार काळ मैदानावर टिकू शकला नाही. २१ चेंडूत २३ धावा करून पोप बाद झाला. त्याने ५ चौकार मारले. रविचंद्रन अश्विनने पोपला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
अश्विनच्या गोलंदाजीवर पोपने कट शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू थोडासा उसळला आणि पोपच्या बॅटला लागून हवेत स्लीपच्या दिशेने गेला. रोहित शर्मा तिथेच उभा होता. रोहितने कोणतीही चूक न करता अचूक झेल टिपला. विशेष म्हणजे रोहितने एका सेकंदापेक्षा (०.४५ सेकंद) कमी रिॲक्शन टाइममध्ये पोपचा झेल घेतला. त्यामुळे इंग्लंडचे मोठे नुकसान झाले. कारण पोपने इंग्लंडसाठी अनेक सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे.
विशेष म्हणजे, कर्णधार रोहित शर्मा इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत धावा करण्यासाठी धडपडत आहे. त्याच्या खराब फॉर्ममुळे त्याच्यावर टीका होत आहे पण या रोहितने आपल्या फिटनेसने सर्वांना प्रभावित केले आहे.
तत्पूर्वी, या कसोटी सामन्यात भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदजी केली आणि सर्वबाद ३९६ धावा केल्या. याच्या प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ पहिल्या डावात २५३ धावात गारद झाला आणि भारताला १५३ धावांची आघाडी मिळाली. यानंतर भारताचा दुसरा डाव २५५ धावांवर आटोपला आणि पहिल्या डावाच्या आधारे इंग्लंडला ३९९ धावांचे लक्ष्य मिळाले.
संबंधित बातम्या
