
IND vs ENG 3rd Test rajkot test : भारत आणि इंग्लंडच्या यांच्यात आजपासून (१५ फेब्रुवारी) तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. राजकोटच्या मैदानावर रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर भारताची फलंदाजी सुरू असून टीम इंडिया मजबूत स्थितीत आहे.
आपला पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या सफराज खान याने अर्धशतकी खेळी केली. तो चांगल्या लयीत दिसत होता आणि वेगाने धावा करत होता. पण या दरम्यान तो रविंद्र जडेजाच्या एका चुकीमुळे धावबाद झाला.
सरफराज धावबाद झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा चांगलाच संतापलेला दिसला. रोहितचा ड्रेसिंग रुपमधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
वास्तविक, रविंद्र जडेजा ९९ धावांवर फलंदाजी करत होता. त्याला शतकासाठी एक धाव हवी होती. पण ही एक धाव पूर्ण करण्याच्या नादात सरफराज खान धावबाद झाला.
डावाच्या ८२व्या षटकात जेम्स अँडरसनच्या चेंडूवर जडेजाने मिडऑनला फटका खेळला. जडेजाने सरफराजला सिंगलसाठी बोलावलं, सरफराज रनसाठी धावला पण जडेजाने नंतर सरफराजला सिंगलसाठी नकार दिला. सरफराज बराच पुढे आला होता, अशा स्थितीत तो परत क्रीजपर्यंत पोहचू शकला नाही. मार्क वूडने थेट स्टंपवर थ्रो मारून सरफराजला धावबाद केले.
सरफराज धावबाद झाल्यानंतर रोहित शर्मा चांगलाच संतापलेला दिसला. रागाच्या भरात त्याने आपल्या डोक्यावरची कॅप काढून जोरात जमिनीवर भिरकावली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सरफराज फलंदाजीला आला तेव्हा जडेजा १५३ चेंडूत ८४ धावा करून फलंदाजी करत होता. यानंतर सर्फराजने ६६ चेंडूंत ९चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ६२ धावांची खेळी केली. तर जडेजाने केवळ १६ धावा करण्यासाठी ४५ चेंडू घेतले. जडेजा नव्वदीत आल्यानंतर धावा करण्यासाठी बराच संघर्ष करत होता, तर सरफराज जडेजाचे शतक पूर्ण व्हावे, यासाठी प्रयत्न करत होता. सरफराजने केवळ ४८ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते.
सरफराज बाद झाल्यानंतर जडेजाने आपल्या कसोटी कारकिर्दीतील चौथे शतक १९८ चेंडूत पूर्ण केले. आता कुलदीप यादव आणि जडेजा मैदानात आहेत. हे वृत्त लिहिपर्यंत भारताने ५ बाद ३२६ धावा केल्या आहेत.
तत्पूर्वी, या सामन्यात भारतीय संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर भारताची सुरुवात खूपच खराब झाली. एकवेळ संघाची धावसंख्या ३ विकेटवर ३३ धावा होती. मात्र यानंतर रोहित शर्माने डाव सावरला. त्याला रवींद्र जडेजाची साथ लाभली. दोघांनी मिळून संघाला संकटातून बाहेर काढले.
रोहित शर्मानेही शतकी खेळी केली. त्याने करिअरचे ११वे शतक केले. रोहित शर्मा १३१ धावा करून बाद झाला. त्याला मार्क वूडने झेलबाद केले. तर यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल आणि रजत पाटीदार पूर्णपणे फ्लॉप झाले.
संबंधित बातम्या
