Border Gavaskar Trophy News : बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये भारतीय संघाच्या खराब कामगिरीच्या पार्श्वभूमीवर रोहित शर्मा याच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. त्यातच त्याची वैयक्तिक कामगिरीही चांगली होत नसल्यानं पाचव्या कसोटीत तो असेल का याबाबतही शंका होती. अखेर त्यानं स्वत:च पुढील सामन्यातून माघार घेतली आहे. तसं त्यानं मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांना कळवलं आहे. त्यामुळं पुढील कसोटीत भारताचं नेतृत्व बुमराह करेल हे स्पष्ट झालं आहे.
भारतीय ड्रेसिंग रुममध्ये सारं काही आलबेल नसल्याचं वृत्त समोर आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी रोहित बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या अंतिम सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या भारताच्या सराव शिबिरात थोडा वेळ दिसला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत गौतम गंभीर यानं संघात कुठलाही वाद नसल्याचं स्पष्ट केलं होतं, मात्र रोहित उद्या खेळणार की नाही याबाबत मौन बाळगलं होतं. 'रोहित विषयी कोणी काळजी करू नये. सर्व काही ठीक आहे. मुख्य प्रशिक्षक इथं आहेत आणि ते पुरेसं आहे. उद्या खेळपट्टी पाहून अंतिम संघाचा निर्णय घेऊ, असं गंभीर म्हणाला.
गंभीर याच्या या वक्तव्यानंतर रोहित कसोटी सामन्यात नसेल हे जवळपास स्पष्ट झालं होतं. त्यावर आता शिक्कामोर्तब झाल्याचं इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तात म्हटलं आहे.
भारताला सिडनी कसोटी जिंकणं आवश्यक आहे. भारतीय वेळेनुसार उद्या पहाटे ४.३० वाजता नाणेफेकीसाठी बुमराह मैदानात उतरेल. बुमराह यानं नोव्हेंबरमध्ये पर्थमध्ये भारताला २९५ धावांनी दणदणीत विजय मिळवून दिला होता. आता त्याची पुनरावृत्ती करण्याची वेळ आली आहे. मालिका बरोबरीत सोडवून बॉर्डर-गावसकर करंडक आपल्याकडंच कायम राखण्याचं आव्हान भारतासमोर आहे. त्यासाठी ही कसोटी गमावून चालणार नाही. बुमराह ही कामगिरी करून दाखवेल असा विश्वास आहे.
रोहित शर्मा शुक्रवारच्या सामन्यात न खेळल्यास एमसीजी कसोटी ही त्याची शेवटची कसोटी ठरू शकते कारण नवीन जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत तो कसोटीत कायम राहण्याची शक्यता नाही, असं बोललं जात आहे.
रोहितच्या 'विश्रांती'मुळं शुभमन गिलच्या तिसऱ्या क्रमांकावर पुनरागमनाचा मार्ग मोकळा झाला आहे. अॅडलेडमध्ये २८ आणि ३१ धावांची खेळी करणाऱ्या या भारतीय युवा खेळाडूला दुर्दैवानं 'कॉम्बिनेशन'मुळं वगळण्यात आलं. मालिकेतील सलामीच्या सामन्यात ऑप्टस स्टेडियमवर विक्रमी २०१ धावांची भागीदारी करणारे यशस्वी जयस्वाल आणि लोकेश राहुल डावाची सुरुवात करतील.
संबंधित बातम्या