भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना राजकोटमध्ये सुरू आहे. आज (१७ फेब्रुवारी) सामन्याचा तिसरा दिवस आहे. भारताने पहिल्या डावात ४४५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा पहिला डाव ३१९ धावांवर आटोपला. आता पहिल्या डावाच्या जोरावर भारताला १२६ धावांची मोठी आघाडी मिळाली आहे.
आज इंग्लंडने २ बाद २०७ धावांवरुन पुढे खेळण्यास सुरुवात केली आणि ११२ धावांची भर घालून उर्वरित ८ विकेट गमावल्या. इंग्लंडकडून बेन डकेटने सर्वाधिक १५३ धावा केल्या. तर भारताकडून मोहम्मद सिराजने ४ विकेट घेतल्या. रविंद्र जडेजालाही दोन विकेट मिळाल्या.
दरम्यान, सोशल मीडियावर या कसोटीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा आणि इंग्लंडच्या फलंदाजीदरम्यानचा आहे. या व्हिडीओत टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा गोलंदाजी करणाऱ्या रविंद्र जडेजाला ट्रोल करताना दिसत आहे.
वास्तविक, रविंद्र जडेजा हा दुसऱ्या दिवशी शेवटच्या सत्रात वारंवार नो बॉल टाकत होता. यामुळे कर्णधार रोहित थोडासा चिडला आणि त्याने जडेजाला टोमणा मारला.
इंग्लंडची दुसरी विकेट पडल्यानंतर रोहित शर्माने जडेजाकेड चेंडू सोपवला. पण जडेजाने जो रूटला गोलंदाजी करताना दोनदा ओव्हरस्टेप केले. दोन नो बॉल पडल्यामुळे रोहित जडेजावर नाराज झाला.
रोहित गमतीने म्हणाला, यार, हा जडेजा तर आयपीएलमध्ये इतके नो-बॉल टाकत नाही. इथे का टाकतोय.' यानंतर रोहित पुढे म्हणाला, चल जड्डू टी-20 आहे असं समजून गोलंदाजी कर'.
रोहित शर्माची ही मजेशीर कमेंट स्टंप माईकमध्ये कैद झाली आणि सर्वत्र पसरली. आता चाहते या व्हिडीओवर मजेशीर कमेंट आणि मिम्स बनवत आहेत.
संबंधित बातम्या