टी-२० विश्वचषकात भारताच्या विजयानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा यानं टी-२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर त्याच्या वन-डे व कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची चर्चा सुरू झाली. त्यावर आता स्वत: रोहितनंच खुलासा केला आहे.
क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेण्याचा कोणताही विचार नाही, असं त्यानं स्पष्ट केलं आहे. 'मी फार पुढचा विचार करत नाही. त्यामुळं आणखी काही काळ तुम्ही मला खेळताना पाहाल,' असं त्यानं रविवारी एका कार्यक्रमात सांगितलं.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह यांनी २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रोहित शर्मा याला टीम इंडियाचा कर्णधार म्हणून घोषित केलं आहे. त्यानंतर निवृत्तीबद्दल रोहित शर्मा याची काय योजना आहे? त्याचा विचार बदलला आहे का? याविषयी सर्वांनाच उत्सुकता होती. मात्र, टी-२० व्यतिरिक्त इतर फॉरमॅटमध्ये मी खेळत राहीन, असं त्यानं सांगितलं.
टीम इंडियाच्या टी-२० विश्वचषकातील विजयानंतर विराट कोहलीने अंतिम सामन्यात सामनावीर पुरस्कार स्वीकारताना क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली, तर रोहित शर्मानं सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत निवृत्तीची घोषणा केली. दुसऱ्या दिवशी रवींद्र जडेजाने सोशल मीडियावर आपल्या निवृत्तीची माहिती दिली. या तिन्ही दिग्गज खेळाडूंच्या निवृत्तीमुळं त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.
वेस्ट इंडिजमधील विजेतेपदानंतर रोहित शर्मा सध्या विश्रांती घेत आहे. या महिन्याच्या अखेरीस श्रीलंकेत होणाऱ्या मर्यादित षटकांच्या सामन्यांना तो मुकणार आहे. या दौऱ्यात भारत आणि श्रीलंकेच्या दरम्यान तीन एकदिवसीय सामने होणार आहेत. रोहित शर्माने टी-२० क्रिकेटमध्ये १५९ सामन्यात ४२३१ धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये खेळताना रोहित शर्मानं पाच शतकं आणि ३२ अर्धशतक ठोकली आहेत.
संबंधित बातम्या