मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Rohit Sharma : आगामी टी-20 विश्वचषकासाठी टीम इंडिया किती तयार? रोहित शर्माने दिलं उत्तर

Rohit Sharma : आगामी टी-20 विश्वचषकासाठी टीम इंडिया किती तयार? रोहित शर्माने दिलं उत्तर

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 18, 2024 01:21 PM IST

Rohit Sharma On T20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्डकपआधी भारताची ही शेवटची मालिका होती. यानंतर भारत आता इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. त्यानंतर आयपीएल होईल.

Rohit Sharma T20 World Cup 2024
Rohit Sharma T20 World Cup 2024 (PTI)

टीम इंडियाने अफगाणिस्तानविरुद्धची तीन सामन्यांची मालिका जिंकली आहे. मालिकेतील शेवटचा सामना (१७ जानेवारी) बंगळुरूच्या चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. हा सामना इतका रोमहर्षक झाला की या सामन्यात दोन सुपर ओव्हर खेळवाव्या लागल्या. दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये भारताने बाजी मारली आणि मालिका ३-० ने जिंकली.

विशेष म्हणजे, टी-20 वर्ल्डकपआधी भारताची ही शेवटची मालिका होती. यानंतर भारत आता इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. त्यानंतर आयपीएल होईल.  अफगाणिस्तान मालिका आणि आयपीएलमधील कामगिरीच्या आधारावर टी-20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची निवड होणार आहे.

अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत रिंकू सिंग आणि शिवम दुबे यांनी आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे. तर कर्णधार रोहित शर्माही तिसऱ्या टी-20 मधून लयीत परतला आहे.

दरम्यान, अफगाणिस्तानविरुद्धच्या या सामन्यानंतर रोहित शर्मानेही टी-20 विश्वचषकाच्या तयारीबाबत मोठे वक्तव्य केले.

टी-20 वर्ल्डकपबाबत रोहित शर्मा काय म्हणाला?

अफगाणिस्तानविरुद्धच्या शेवटच्या टी-20 सामन्यानंतर जिओ सिनेमासाठी दिलेल्या मुलाखतीत रोहित शर्मा म्हणाला की, ५० षटकांचा विश्वचषक माझ्यासाठी नेहमीच सर्वात महत्त्वाचा असेल कारण मी तो पाहतच मोठा झालो आहे. 

पण सध्या आमची नजर मोठ्या गोष्टींवर आहे. जून महिन्यात होणार इव्हेंट. आम्ही अद्याप आमचा १५ जणांचा संघ निश्चित केलेला नाही, पण आमच्या मनात असे ८ ते १० खेळाडू आहेत. 

आम्ही परिस्थिती लक्षात घेऊन त्यानुसार संघ निवडू. कारण वेस्ट इंडिजमधील खेळपट्ट्या थोड्या संथ आहेत, त्यामुळे आम्हाला त्यानुसार आमचे नियोजन करावे लागेल. आता आमच्याकडे आणखी एक संधी आहे आणि ती लक्षात घेऊन आम्ही हा विश्वचषक कसा जिंकू शकतो यासाठी नियोजन करू.' 

टी-20 वर्ल्डकपमध्येही रोहित कॅप्टन असणार

अफगाणिस्तानविरुद्धच्या या टी-20 मालिकेसाठी जेव्हा संघाची घोषणा करण्यात आली, तेव्हाच रोहित शर्मा आगामी टी-20 वर्ल्डकपमध्येही टीम इंडियाचे नेतृत्व करेल, हे स्पष्ट झाले होते. 

या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात शून्यावर बाद झाल्यानंतर अखेरच्या सामन्यात रोहितने शानदार शतक झळकावले. रोहितचे हे T20 आंतरराष्ट्रीय मधील पाचवे शतक होते आणि असे करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे.

WhatsApp channel