भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया बॉर्डर गावस्कर ट्रॉफीला २२ नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला सामना पर्थ येथे खेळला जाणार आहे. या सामन्याआधी टीम इंडिया कोणत्या ११ खेळाडूंसोबत मैदानात उतरणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे.
दरम्यान, कर्णधार रोहित शर्मा अनुपलब्ध असल्याने आणि काही खेळाडू जखमी झाल्याच्या बातम्या येत आहेत. अशा परिस्थितीत प्लेइंग इलेव्हन निवडण्यासाठी संघ व्यवस्थापनालाही बरीच कसरत करावी लागणार आहे. चला तर मग पाहूया पहिल्या कसोटीसाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन कशी असू शकते.
कर्णधार रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी उपलब्ध नाही. हिटमॅनच्या घरी नुकताच छोटा पाहुणा आला आहे. अशा स्थितीत तो पहिला सामना सोडून कुटुंबासोबत थोडा वेळ घालवण्याची शक्यता आहे.
रोहितच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराह संघाचा कर्णधार असणार आहे. पण रोहितच्या अनुपस्थितीत डावाची सुरुवात कोण करणार या प्रश्नाचे उत्तर अद्याप सापडलेले नाही. यापूर्वी असे म्हटले जात होते की शुभमन गिल डावाची सुरुवात करू शकतो. कारण त्याने गेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अशी कामगिरी केली होती, परंतु पर्थ कसोटीपूर्वी त्याच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाले आहे आणि तो पहिल्या कसोटीतून बाहेर पडला आहे.
अशा परिस्थितीत यशस्वी जैस्वालसोबत केएल राहुल डावाची सुरुवात करू शकतो.
गिलच्या अनुपस्थितीत भारतासमोर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी दोन पर्याय आहेत. सध्याच्या संघात अभिमन्यू ईश्वरन हे काम करू शकतो, तर संघ व्यवस्थापनाने देवदत्त पडिक्कललाही ऑस्ट्रेलियात थांबवून ठेवले आहे. पडिक्कलला पर्थ कसोटीत संधी मिळू शकते, असा कयास लावला जात आहे.
नितीश रेड्डी आणि हर्षित राणा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत पदार्पण करू शकतात. पर्थच्या उसळत्या खेळपट्टीवर हे दोघे भारताला वेगवान गोलंदाजीचे अतिरिक्त पर्याय उपलब्ध करून देतील. त्याचबरोबर नितीश असल्याने फलंदाजीलाही पर्याय मिळेल.
यानंतर मधल्या फळीत हा ध्रुव जुरेल की सरफराज खान हाही मोठा प्रश्न आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत सरफराजला संधी मिळाली ज्यात त्याने एका डावात १५० धावाही केल्या, पण ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या खेळपट्ट्यांमध्ये बराच फरक आहे.
ध्रुव जुरेलने नुकतीच ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या दोन्ही डावात अर्धशतके झळकावली. संघ व्यवस्थापनही ही कामगिरी आपल्या मनात ठेवेल. अशा स्थितीत सरफराजऐवजी ध्रुव जुरेल पर्थ कसोटी खेळू शकतो.
पर्थ कसोटीसाठी भारतीय प्लेइंग इलेव्हन : यशस्वी जैस्वाल, लोकेश राहुल, देवदत्त पडिक्कल/अभिमन्यू ईश्वरन, विराट कोहली, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, नितीश रेड्डी, आकाशदीप सिंग, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह