Boxing Day Test Rohit Sharma Opening : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची चौथी बॉक्सिंग डे कसोटी २६ डिसेंबरपासून मेलबर्नच्या मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळवली जाणार आहे. या सामन्यापूर्वी एक मोठा दावा करण्यात आला आहे. मेलबर्न कसोटीत भारतीय कर्णधार रोहित शर्मा त्याच्या जुन्या नंबरवर म्हणजेच ओपनिंगला खेळताना दिसू शकतो.
आतापर्यंत खेळल्या गेलेल्या तीन कसोटींमध्ये केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल सलामीला खेळले आहेत. त्यामुळे भारतीय कर्णधार सलामीला आल्यास केएल राहुलला खालच्या क्रमांकावर फलंदाजी करावी लागू शकते.
एका वर्तमान पत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार रोहित शर्मा बॉक्सिंग डे टेस्टमध्ये ओपनिंग करताना दिसणार आहे. या स्थितीत केएल राहुल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसू शकतो. भारतीय कर्णधार आतापर्यंत मालिकेतील दोन्ही कसोटींमध्ये फ्लॉप दिसला आहे. त्याचवेळी सलामीला खेळलेल्या केएल राहुलच्या बॅटमधून धावा आल्या आहेत.
मालिकेतील तीन कसोटी सामन्यांच्या ६ डावात फलंदाजी करताना राहुलने ४७ च्या सरासरीने २३५ धावा केल्या आहेत. या मालिकेत तो भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. रोहित शर्मा पर्थ येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या कसोटीसाठी उपलब्ध नव्हता, त्याच्या अनुपस्थितीत केएल राहुल सलामीला खळला.
त्यानंतर रोहित शर्माच्या पुनरागमनानंतरही पुढील दोन कसोटींमध्ये सलामीची जबाबदारी राहुलने घेतली. मात्र, बॉक्सिंग डे कसोटीत रोहित शर्माच्या सलामीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
रोहित शर्माने २०२४ मध्ये आतापर्यंत १३ कसोटी खेळल्या आहेत. या सामन्यांमध्ये त्याने २६.३९ च्या सरासरीने ६०७ धावा केल्या आहेत. तर मागील १३ डावांमध्ये रोहितने १२ पेक्षा कमी सरासरीने १५२ धावा केल्या आहेत. आता बॉक्सिंग डे कसोटीत रोहित शर्मा कशी कामगिरी करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
संबंधित बातम्या