Rohit Sharma Fan Breached Security : T20 विश्वचषक 2024 चा शेवटचा सराव सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळला गेला. या सामन्यात भारतीय खेळाडूंनी शानदार खेळ केला. पण या मॅचचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. रोहित शर्माचा एक फॅन सुरक्षेला चकमा देत भर मैदानात घुसला.
भारताने शनिवारी (१ जून) T20 विश्वचषकातील एकमेव सराव सामन्यात बांगलादेशचा ६० धावांनी पराभव केला. भारताने प्रथम फलंदाजी करताना ५ गड्यांच्या मोबदल्यात १८२ धावा करत बांगलादेशला ९ गड्यांच्या मोबदल्यात १२२ धावांवर रोखले. न्यूयॉर्कमधील नॅसाऊ काउंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला गेला.
तत्पूर्वी, भारताच्या क्षेत्ररक्षणादरम्यान, एक चाहता सुरक्षा प्रोटोकॉल तोडून मैदानात घुसला आणि रोहित शर्माच्या जवळ गेला, यानंतर त्याला पोलिसांनी लगेच पकडले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सामना काही काळ थांबवावा लागला.
यावेळी, रोहित शर्माची रिअॅक्शन पाहण्यासारखी होती, प्रत्यक्षात व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा पोलिस कर्मचाऱ्यांना त्या चाहत्यावर दया दाखवण्यास सांगत आहे आणि त्याला कोणत्याही प्रकारची शिक्षा करू नका, असे सांगताना दिसत आहे.
बांगलादेशविरुद्धच्या एकमेव सराव सामन्यात ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, शिवम दुबे आणि अर्शदीप सिंग यांनी आपली क्षमता दाखवली. ऋषभ पंतने ३२ चेंडूत ५३ धावा केल्या. हार्दिक पांड्याने २३ चेंडूत नाबाद ४० धावा केल्या.
तर गोलंदाजीत शिवम दुबेने ३ षटकात २ बळी घेतले. अर्शदीप सिंगनेही ३ षटकांत १२ धावांत २ बळी घेतले. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतीय खेळाडूंनी शानदार खेळ केला. टीम इंडियाने २० षटकात ५ गडी गमावून १८२ धावा केल्या आणि बांगलादेशला १८३ धावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ २० षटकांत ९ गडी गमावून १२२ धावाच करू शकला. बांगलादेशकडून महमुदुल्लाहने २८ चेंडूत ४० धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत ४ चौकार आणि १ षटकार लगावला. तर शाकिब अल हसनने ३४ चेंडूत २८ धावा केल्या. भारताने हा सामना ६० धावांनी जिंकला