टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय संघ आता आपल्या देशात परतला आहे. चॅम्पियन संघाला घरी परतायला उशीर झाला. बार्बाडोसची राजधानी ब्रिजटाऊनला आलेले बेरील वादळ हे त्यामागचे कारण होते, त्यामुळे भारतीय संघ गुरुवारी (४ जुलै) भारतात आला.
मायदेशी परतताच भारतीय संघाने सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. . यानंतर संपूर्ण भारतीय संघ मुंबई व्हिक्टरी परेडसाठी रवाना झाला.
विजयी परेडनंतर वानखेडे स्टेडियमवर खेळाडूंचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या रोड शोनंतर सर्व खेळाडूंनी आपापल्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
घरी पोहोचताच सर्व चॅम्पियन्ससाठी सेलिब्रेशनची खास व्यवस्था करण्यात आली होती. असंच काहीसं रोहित शर्मासोबतही पाहायला मिळालं. रोहित शर्माचं त्याच्या घरी जंगी स्वागत झाले. त्याचे कुटुंबीय, बालपणीचे मित्र आणि मुंबई इंडियन्स संघातील सहकारी तिलक वर्मा यांनी त्याच्या स्वागत समारंभाचे आयोजन केले होते.
त्याच्या बालपणीच्या मित्रांनी, 'रोहित शर्मा'चे नाव आणि फोटो असलेले टी-शर्ट घातले होते. रोहित घरी येताच सर्वांनी नाचून त्याचे स्वागत केले. रोहितला खांद्यावर घेऊन घरात गेले. विश्वचषक विजेत्यांचे हे खरोखरच अप्रतिम स्वागत होते.
गुरुवारी मोठ्या थाटामाटात विजयी मिरवणूक झाल्यानंतर शुक्रवारीही सेलिब्रेशन सुरूच राहणार आहे. विश्वचषक विजेता भारतीय कर्णधार रोहित शर्माला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत आमंत्रित केले आहे. त्याच्यासोबत सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल हेही शिंदे यांची भेट घेणार आहेत.
रोहित शर्माने टी-20 विश्वचषक २०२४ स्पर्धेत एकूण ८ सामने खेळले आहेत. या आठ सामन्यांमध्ये त्याने १५६ च्या स्ट्राइक रेटने २५७ धावा केल्या, ज्यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने २४ चौकार आणि १५ षटकार मारले.
संबंधित बातम्या