टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळत आहे. या कसोटी मालिकेतील दोन सामने खेळले गेले असून सध्या मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याची कामगिरी या मालिकेतही कायम आहे.
पिंक बॉल कसोटीत रोहित शर्माला दोन्ही डावात मिळून केवळ ९ धावा करता आल्या. यानंतर त्याच्यावर बरीच टीका होत आहे. ब्रिस्बेनमध्ये खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू डॅरिल कलिनन याने रोहितवर निशाणा साधला आहे.
वास्तविक, रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीसाठी उपलब्ध नव्हता. त्याच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराहने संघाची धुरा सांभाळली आणि त्यानंतर रोहितने ॲडलेड कसोटीत पुनरागमन केले.
बुमराहच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २९५ धावांनी विजय मिळवला, तर दुसऱ्या कसोटीत रोहितचे पुनरागमन होऊनही भारतीय संघाला १० गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. आता तिसरा कसोटी सामना गाब्बामध्ये खेळवला जाणार आहे, ज्यामध्ये टीम इंडियाची नजर विजयाकडे आहे.
१४ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी रोहितचा फॉर्म सर्वांचीच चिंता वाढवत आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटर डॅरिल डॅरिल कलिनन याने त्याची खिल्ली उडवली आहे. इनसाइडस्पोर्ट्सशी झालेल्या संभाषणात माजी क्रिकेटपटू म्हणाला, की “तूम्ही रोहितकडे बघा आणि विराटकडे बघा. फिटनेसमधील फरक तुम्हाला स्पष्टपणे दिसेल. रोहितचे वजन जास्त असल्याने तो जास्त काळ क्रिकेट खेळू शकत नाही. ४ किंवा ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी रोहितची फिटनेस किंवा शारीरिक स्थिती चांगली नाही.”
कर्णधार रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात ३ धावा आणि दुसऱ्या डावात ६ धावा केल्या. याआधी त्याने भारत विरुद्ध पीएम इलेव्हन सामन्यातही ३ धावा केल्या होत्या.
त्याचवेळी, न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात, पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात त्याने ५२ धावांची खेळी केली होती. यानंतर त्याची बॅट शांत राहिली.
रोहितच्या सध्याच्या फॉर्ममुळे WTC फायनलमधील भारतीय संघाचे टेन्शन वाढले आहे. भारताला WTC फायनलमध्ये पोहोचायचे असेल तर उर्वरित तीन कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत करावे लागेल.
संबंधित बातम्या