भारतीय वनडे क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या खराब फॉर्मात आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी हिटमॅनसाठी एखाद्या वाईट स्वप्नासारखी होती. त्याची बॅट पूर्णपणे शांत राहिली. यानंतर त्याने भारतात येऊन रणजी ट्रॉफी खेळण्याचा निर्णय घेतला. पण येथेही तो फ्लॉप ठरला.
रेड बॉल क्रिकेटमध्ये रोहितचा फॉर्म अतिशय वाईट असल्याचे स्पष्ट झाले. पण १९ फेब्रुवारीपासून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होत आहे. या व्हाईट बॉल टूर्नामेंटमध्ये शर्माकडून सगळ्यांना खूप अपेक्षा असतील. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडिया इंग्लंडसोबत तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे, ज्यामध्ये रोहित मोठी कामगिरी करू शकतो.
३७ वर्षीय रोहित शर्मा एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून ९००० धावा पूर्ण करण्यापासून फक्त १६४ धावा दूर आहे. वनडे फॉरमॅटमध्ये सलामीला खेळताना त्याच्या नावावर सध्या ८८३६ धावा आहेत. आगामी इंग्लंड मालिकेत किंवा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही तो ९००० धावांचा आकडा गाठू शकतो.
रोहितच्या आधी एकदिवसीय सामन्यात सलामीवीर म्हणून ५ खेळाडूंनी हा पराक्रम केला होता. सलामीवीर म्हणून ९००० धावा पूर्ण करणारा रोहित शर्मा सहावा खेळाडू ठरणार आहे.
सचिन तेंडुलकर- १५३१० धावा
सनथ जयसूर्या- १२७४० धावा
ख्रिस गेल- १०१७९ धावा
ॲडम गिलख्रिस्ट-९२०० धावा
सौरव गांगुली-९१४६ धावा
रोहित शर्माने २००७ मध्ये वनडे पदार्पण केले. तेव्हापासून, त्याने एकूण २६५ एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने २५७ डावांमध्ये १०८६६ धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ३१ शतके आणि ५७ अर्धशतके आहेत.
बीजीटीमधील खराब कामगिरीनंतर रोहित शर्माच्या कर्णधारपदावर आणि फॉर्मवर प्रश्न उपस्थित केले जात होते. वातावरण पूर्णपणे त्याच्या विरोधात गेले होते. मात्र असे असतानाही बीसीसीआयने आयसीसीच्या मोठ्या स्पर्धेपूर्वी संघाच्या कर्णधारात कोणताही बदल केला नाही. रोहितला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाचा कर्णधार बनवण्यात आले. टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीचे सर्व सामने युएईमध्ये खेळणार आहे.
संबंधित बातम्या