इंडियन प्रीमियर लीग २०२४ मध्ये आज (१४ एप्रिल) चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स आमनेसामने आहेत. दोन्ही संघांमधील हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे.
या सामन्यात सीएसकेने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात २०६ धावा केल्या आहेत. त्यांच्याकडून शिवम दुबे आणि ऋतुराज गायकवाड यांनी अर्धशतके केली.
पण या सामन्यातील, रोहित शर्माचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. चाहतेही या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
वास्तिवक, रोहित शर्माने सीएसकेचा कर्णधार ऋतुराज गायकवाडचा एक झेल सोडला. सीएसेकच्या डावातील १२ वे षटक आकाश मढवाल टाकत होता. या षटकातील चौथ्या चेंडूवर गायकवाडने मिडविकेटवर हवेत शॉट मारला. चेंडू हवेत होता आणि रोहित शर्मा त्या एरियात क्षेत्ररक्षण करत होता. चेंडू हवेत आपल्याकडे येत असल्याचे पाहून रोहितने डाईव्ह मारत तो झेलण्याचा प्रयत्न केला. पण चेंडूत त्याच्या हाताखाली आला, पण तो त्याला झेलता आला नाही. कॅचसाठी रोहितचा प्रयत्न जबरदस्त होता. हा झेल घेण्याच्या नादात त्याची पँट खाली आली. या प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अशा प्रकारे ऋतुराज गायकवाडला निःसंशयपणे रोहित शर्माकडून जीवदान मिळाले, पण ऋतुराजला त्याचा पुरेपूर फायदा त्याला घेता आला नाही. तो ४० चेंडूत ६९ धावांची खेळी करून बाद झाला. या खेळीत त्याने ५ षटकार आणि तेवढेच चौकार मारले. या काळात त्याला शिवम दुबेचीही उत्तम साथ मिळाली. शिवम दुबेने स्फोटक फलंदाजी करत अवघ्या २८ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने ३८ चेंडूत नाबाद ६८ धावा केल्या. या खेळीत त्याने २ षटकार आणि १० षटकार मारले.
तत्पूर्वी, टॉस गमावून फलंदाजीला आलेल्या सीएसकेची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीला आलेला अजिंक्य रहाणे अवघ्या ५ धावांवर बाद झाला. त्यानंतर सीएसकेचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याने रचिन रवींद्रला साथीला घेत डाव सावरला. पण रचिन जास्त वेळ क्रीजवर राहू शकला नाही.
यानंतर गायकवाडने शिवम दुबेसोबत शानदार भागिदारी केली. गायकवाड आणि दुबे यांनी मिळून धावांचा वेग कमी होऊ दिला नाही.
महेंद्रसिंग धोनी सीएसकेसाठी शेवटच्या षटकात फलंदाजीला आला. येताच त्याने ४ चेंडूत नाबाद २० धावा केल्या. त्याने हार्दिक पंड्याच्या या षटकात सलग ३ षटकार मारले. या फलंदाजांच्या जोरावर सीएसकेने २०६ धावांपर्यंत मजल मारली.
संबंधित बातम्या