टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याचे अनेक खेळाडूंनी कौतुक केले आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने टी-20 विश्वचषक २०२४ चे विजेतेपद पटकावले. त्याआधी एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास केला. रोहितचे सहकारी खेळाडूंशी चांगले संबंध आहेत. नुकताच भारताचा माजी क्रिकेटपटू पियुष चावलाने रोहितबाबत एक महत्त्वाचा खुलासा केला आहे.
रोहित संघासाठी कसा विचार करतो हे चावलाने सांगितले. रोहितने एकदा चावलाला रात्री उशिरा मेसेज केला होता.
पीयूष चावलाने शुभंकर मिश्रा याच्या पॉडकास्टमध्ये रोहित शर्माबद्दल या गोष्टींचा खुलासा केला. यादरम्यान चावलाने रोहितला चांगला लीडर म्हणून वर्णन केले. रोहितच्या नेतृत्वाखाली पीयूष चावला मुंबई इंडियन्सकडून खेळला आहे. सध्या चावला यूपी T20 लीगचा भाग आहे.
या पॉडकास्टमध्ये चावला म्हणाला, की “मी त्याच्यासोबत खूप क्रिकेट खेळलो आहे, त्यामुळे माझे त्याच्याशी चांगले नाते आहे. एकदा रात्री २.३० वाजता त्याने मला मेसेज केला आणि विचारले, तू जागा आहेस का? यानंतर त्याने कागदावर फील्ड बनवले आणि वॉर्नरला बाद करण्याबाबत माझ्याशी चर्चा केली. त्यावेळीही तो माझ्याकडून सर्वोत्तम कसा मिळवू शकतो याचा विचार करत होता.”
रोहितच्या कर्णधारपदाबद्दल बोलताना तो म्हणाला, एक कर्णधार असतो, एक जण लीडर असतो. तो कर्णधार नाही, तो लीडर आहे. २०२३ चा एकदिवसीय विश्वचषक असो किंवा २०२४ चा टी-20 विश्वचषक असो, त्याने ज्या पद्धतीने फलंदाजी केली, त्यामुळे पुढील फलंदाजांना सोपे वाटेल असा टोन सेट केला. तो खरा लीडर आहे. तो तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य देतो."
रोहित आणि पियुष चावला खूप एकत्र खेळले आहेत. हे दोन्ही खेळाडू मुंबई इंडियन्सकडून खूप खेळले आहेत. रोहितच्या नेतृत्वाखाली चावलाने मुंबईसाठी अनेक वेळा चमकदार कामगिरी केली आहे. चावलाने आतापर्यंत आयपीएलमध्ये १९२ सामने खेळले आहेत. या कालावधीत १९२ विकेट्स घेतल्या आहेत. १७ धावांत ४ बळी घेणे ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
पीयूष चावलाने भारताकडून २५ एकदिवसीय सामन्यांमध्ये ३२ विकेट घेतल्या आहेत. ७ टी-20 सामन्यात ४ विकेट घेतल्या आहेत.