Mumbai Indians IPL 2024 : भारत आणि इंग्लंड यांच्यात नुकतीच ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळली गेली. या मालिकेत टीम इंडियाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली इंग्लंडचा ४-१ ने धुव्वा उडवला. या मालिकेनंतर आता टीम इंडियाचे खेळाडू आयपीएलची तयारी करण्यात व्यस्त झाले आहेत.
मात्र स्पर्धेपूर्वी एक मोठी माहिती समोर येत आहे. आयपीएल २०२४ पूर्वी मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसू शकतो. कारण रोहित शर्मा दुखापतीमुळे आयपीएल २०२४ मधून बाहेर पडू शकतो. मुंबई इंडियन्स यंदा हार्दिक पांड्या यांच्या नेतृत्वात खेळणार आहे.
वास्तविक, इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या कसोटीत सामन्यातील तिसऱ्या दिवशी रोहित शर्मा फिल्डिंगसाठी मैदानात आला नव्हता. रोहित शर्माने पाठीच्या दुखापतीची तक्रार केली होती. यानंतर रोहित शर्माच्या जागी जसप्रीत बुमराहने धरमशाला कसोटीत तिसऱ्या दिवशी कर्णधारपद भूषवले.
तथापि, रोहित शर्माची समस्या गंभीर आहे की किरकोळ हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. जर रोहित शर्माची दुखापत गंभीर असेल तर त्याला आयपीएल २०२४ ला मुकावे लागू शकते.
तसेच, रोहित शर्मा आयपीएलमध्ये खेळणार की नाही याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत अपडेट मिळालेले नाही. पण रोहित शर्मा नवीन कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळणार की नाही? नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
आयपीएल २०२४ साठीच्या मिनी ऑक्शननंतर मुंबई इंडियन्सने एक मोठा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला ट्रे़डच्या माध्यमातून आपल्या संघात घेतले आणि कर्णधार बनवले. याआधी हार्दिक पांड्याने गुजरात टायटन्सचे दोन मोसमात नेतृत्व केले होते.
रोहित शर्माने आपल्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला पाच वेळा विजेतेपद मिळवून दिले, पण तरीही रोहितकडून कर्णधारपद हिसकावून घेण्यात आले.
या निर्णयानंतर रोहित शर्माचे चाहते चांगलेच नाराज झाले होते. तसेच, चाहत्यांनी रोहितने हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळू नये, अशी भूमिका सोशल मीडियावर घेतली होती.