टीम इंडियाचा युवा क्रिकेटपटू सरफराज खान याने १५ फेब्रुवारी २०२४ रोजी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्याने आपल्या आंतरराष्ट्रीय करिअरची सुरुवात केली. यानंतर आता १९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या भारत आणि बांगलादेश कसोटी मालिकेसाठीही त्याची निवड करण्यात आली आहे.
बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी सरफराज खानची एक मुलाखत व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचे कौतुक करताना दिसत आहे. यासोबतच तो रोहितची तुलना 'लगान' चित्रपटातील आमिर खानसोबत करत आहे.
जिओ सिनेमाशी बोलताना सरफराज खान म्हणाला, "रोहित खूप वेगळा आहे. तो नेहमीच तुम्हाला निवांत वाटतो आणि सर्व खेळाडूंना समान मान देतो. तो कुणालाही ज्युनियर किंवा सीनियर म्हणून पाहत नाही, तर सगळ्यांना समान मानतो. तो चांगला वागतो. त्याच्या हाताखाली खेळण्याचा अनुभव खूप छान आहे.
सरफराज पुढे म्हणाला, "लगान हा माझा आवडता चित्रपट आहे आणि ज्याप्रमाणे आमिर खानने त्या चित्रपटात आपली टीम तयार केली, त्याचप्रमाणे रोहित शर्माने आमची टीम एकत्र ठेवली आहे. तो आमच्या टीमचा आमिर खान आहे."
सरफराज खानने पदार्पणाच्या कसोटी मालिकेत तीन सामने खेळले. या तीन सामन्यांमध्ये त्याने ५ डाव खेळले. या ५ डावांमध्ये सरफराजने ५० च्या सरासरीने २०० धावा केल्या. यामध्ये ३ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या म्हणजे नाबाद ६८ धावा आहे.
रोहित शर्माने २०२२ मध्ये विराट कोहलीकडून कर्णधारपदाची सूत्रे स्वीकारली आणि तेव्हापासून १६ कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला कसोटी क्रिकेटमध्ये नवी ऊर्जा आणि आत्मविश्वास मिळाला आहे. कसोटी कर्णधार म्हणून या १६ कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाने १० सामने जिंकले आणि ४ सामने गमावले आहेत. तर दोन सामन्यांचा निकाल लागला नाही.