भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे. आता दोन्ही संघ मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (MCG) आमनेसामने येणार आहेत. या सामन्यात टीम इंडिया मोठा बदल करून कर्णधार रोहित शर्माच्या जागी विकेटकीपर फलंदाज ध्रुव जुरेल याला सहाव्या क्रमांकावर संधी देऊ शकते.
अलीकडच्या काळात रोहितचा फॉर्म चिंताजनक आहे. सोबतच मेलबर्नमध्ये सराव करताना रोहित शर्मा जायबंदी झाला होता. त्याला थ्रोडाउन स्पेशालिस्ट दयाचा सामना करताना चेंडू लागला.
२६ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या बॉक्सिंग डे कसोटीसाठी रोहित फिट नसल्यास त्याच्या जागी यष्टिरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलला खेळण्याची संधी मिळू शकते.
या मालिकेत रोहित ६ वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर ओपनिंगऐवजी सहाव्या क्रमांकावर खेळताना दिसला. तथापि, संघ व्यवस्थापनाची ही चाल कामी आली नाही, भारतीय कर्णधाराने गेल्या दोन सामन्यांमध्ये एकही मोठी खेळी केली नाही.
सध्या सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये सहाव्या क्रमांकावर खेळत असलेल्या रोहितने तीन डावात ३, ६ आणि १० धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियापूर्वी बांगलादेश आणि न्यूझीलंडविरुद्धच्या मायदेशातील मालिकेतही रोहितला फलंदाजीत चांगली कामगिरी करता आली नाही.
सध्या दोन्ही संघांमधील मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. मालिका जिंकण्यासाठी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी भारताला हा सामना जिंकणे खूप महत्त्वाचे आहे. हे पाहता संघ काही धाडसी निर्णय घेऊ शकतो.
रोहितच्या खराब फॉर्मनंतर त्याच्या जागी जुरेललाखेळवण्याची मागणीही जोर धरू लागली आहे कारण कांगारू संघाविरुद्ध यष्टीरक्षक फलंदाजाचा रेकॉर्ड चांगला आहे. ज्युरेलने बॉर्डर-गावसकर करंडक स्पर्धेपूर्वी भारत अ संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर बॅटने चांगली कामगिरी केली होती.
त्याने चार डावात ८०, ६८, ११ आणि १ धावा करून सर्वांना प्रभावित केले. याशिवाय, तो गेल्या दोन महिन्यांपासून ऑस्ट्रेलियात आहे आणि कदाचित त्याला रोहितपेक्षा मधल्या फळीत फलंदाजी करताना परिस्थितीची चांगली समज आहे. तसेच, हे विसरता कामा नये की, ऑस्ट्रेलियाला जाण्यापूर्वी ज्युरेलने डोमेस्टिक सर्किटमध्ये लाल चेंडूने चांगले क्रिकेट खेळले होते.