टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याचा खराब फॉर्म कायम आहे. रणजी ट्रॉफीमध्येही त्याच्या बॅटमधून धावा निघने बंद झाले आहे. जम्मू-काश्मीरसारख्या दुबळ्या संघाविरुद्धही तो दोन्ही डावांत अपयशी ठरला.
ऑस्ट्रेलियातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफी दरम्यान रोहितला प्लेइंग-११ मधून वगळण्यात आले होते. यानंतर रोहित शर्माने फॉर्म मिळविण्यासाठी रणजी ट्रॉफी खेळण्याचा निर्णय घेतला. परंतु येथेही फ्लॉप ठरला. जम्मू-काश्मीरसारख्या छोट्या संघाविरुद्धही तो दोन्ही डावांत स्वस्तात बाद झाला.
पहिल्या डावात ३ धावा करून बाद झालेला रोहित शर्मा दुसऱ्या डावात काहीसा आक्रमक दिसला, पण एका अत्यंत विचित्र शॉटवर तो झेलबाद झाला. त्याने २८ धावांची खेळी केली.
पहिल्या डावात तो उमर नझीरच्या गोलंदाजीवर बाद झाला होता. तर दुसऱ्या डावात त्याला युधवीर सिंगने बाद केले. युधवीरच्या चेंडूवर आबिद मुश्ताकने एका हाताने करिष्माई झेल घेतला. रोहितने या खेळीत २ चौकार आणि ३ षटकार मारले, ज्यामुळे चाहत्यांना नक्कीच दिलासा मिळाला.
रोहित शर्माकडून सगळ्यांना मोठ्या खेळीची अपेक्षा होती, पण तो अपयशी ठरला आहे. पाकिस्तानमध्ये होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी त्याची टीम इंडियाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. म्हणजेच तो आपली जागा वाचवण्यात यशस्वी झाला आहे.
त्याआधी भारताला इंग्लंडविरुद्ध ३ वनडे सामन्यांची मालिका खेळायची आहे. अशाप्रकारे रोहितला फॉर्म मिळवण्याची शेवटची संधी वनडे मालिका असेल.
संबंधित बातम्या