Rohit Sharma in BGT 2024-25 : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ चा चौथा कसोटी सामना २६ डिसेंबरपासून मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळवला जात आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ कसोटी सामन्यांची मालिका तीन सामन्यांनंतरही १-१ अशी बरोबरीत आहे.
या मालिकेत अनुभवी खेळाडू आणि टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा त्याच्या फॉर्मच्या शोधात आहे. आपला फॉर्म परत मिळवण्यासाठी रोहितने मेलबर्न कसोटीत त्याचा फलंदाजीचा क्रमदेखील बदलला. परंतु रोहितच्या फलंदाजीत काहीही बदल झाला नाही. बॉक्सिंग डे कसोटीच्या पहिल्या डावात सलामीला आलेल्या रोहितला केवळ ३ धावा करता आल्या. पॅट कमिन्सने त्याला शॉर्ट बॉलवर झेलबाद केले.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ च्या ॲडलेड आणि ब्रिस्बेन कसोटीत रोहित शर्मा ६ व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांमध्ये यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल भारताकडून सलामीला खेळले. मात्र चौथ्या कसोटीत रोहित शर्मा यशस्वी जयस्वालसोबत सलामीला आला. पण रोहितसोबत पुन्हा तीच जुनी गोष्ट घडली.
भारतीय डावाच्या अवघ्या २ षटकाच्या शेवटच्या चेंडूवर रोहित बाद झाला. पॅट कमिन्सने रोहित शर्माला शॉर्ट बॉल टाकला. या चेंडूला रोहितने ऑन साइडच्या दिशेने खेचण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू बॅटवर बरोबर आला आणि हवेत उडाला. यानंतर स्कॉट बोलंडने रोहितचा एक सोपा झेल घेतला. मेलबर्न कसोटीत सलामीला आलेल्या रोहित शर्माने केवळ ५ चेंडू खेळले आणि ३ धावा करून तो बाद झाला.
ॲडलेड आणि ब्रिस्बेन कसोटीनंतर रोहित शर्माने मेलबर्न कसोटीच्या पहिल्या डावापर्यंत ४ डाव खेळले आहेत. या चार डावांत त्याने केवळ २२ धावा केल्या आहेत. ॲडलेड कसोटीच्या पहिल्या डावात ३ धावा केल्यानंतर आणि दुसऱ्या डावात ६ धावा करून तो बाद झाला.
ब्रिस्बेन कसोटीच्या पहिल्या डावात १० धावा करून तो बाद झाला. आता तो मेलबर्न कसोटीच्या पहिल्या डावात ३ धावा करून बाद झाला आहे.
भारत विरुद्ध बांगलादेश पहिली कसोटी: ६, ५
भारत विरुद्ध बांगलादेश दुसरी कसोटी: २३, ८
भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिली कसोटी: २, ५२
भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरी कसोटी: ०, ८
भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरी कसोटी: १८, ११
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरी कसोटी: ३, ६
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरी कसोटी: १०
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथी कसोटी: ३
संबंधित बातम्या