Ranji Trophy Rohit Sharma-Yashasvi Jaiswal : भारतीय कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा तब्बल दशकभरानंतर रणजी ट्रॉफीमध्ये परतला. मुंबईच्या बीकेसी मैदानावर आजपासून (गुरुवार) मुंबई आणि जम्मू-काश्मीर संघ आमनेसामने आहेत. यावेळी सर्वांच्या नजरा मुंबईच्या रोहित आणि यशस्वी जैस्वाल यांच्यावर होत्या.
बुधवारी रात्री कोलकाता टी-२० मधील स्फोटक कामगिरीनंतर भारतीय चाहते उत्साहात होते, पण दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी सकाळी त्यांची निराशा झाली.
कारण टीम इंडियाचा वनडे आणि कसोटी कर्णधार रोहित शर्मा खराब कामगिरी सुरूच आहे. रणजी ट्रॉफी सामन्यात रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल हे दोघे फ्लॉप ठरले. यशस्वी जैस्वाल ४ धावा करून आकिब नबीच्या चेंडूवर एलबीडब्ल्यू आऊट झाला.
तर रोहित शर्माही ३ धावा करून उमर नझीरच्या चेंडूवर पीके डोगराकरवी झेलबाद झाला. रोहित शर्मा ९ वर्ष ३ महिन्यांनंतर रणजी खेळायला आला.
गेल्या काही महिन्यांपासून ३७ वर्षीय रोहितला मोठी खेळी खेळता आलेली नाही. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दारुण पराभवानंतर त्याच्यावर टीकेची झोड उठत आहे. मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात रोहितला ३ कसोटीच्या ५ डावात केवळ ३१ धावा करता आल्या होत्या.
भारतीय कर्णधार रोहित शर्माने याआधी आपला शेवटचा रणजी क्रिकेट खेळताना २०१५ (७ ते १० नोव्हेंबर) मध्ये खेळला होता. त्यावेळी रोहितने वानखेडे स्टेडियमवर यूपीविरुद्ध ११३ धावांची शानदार खेळी केली होती.
रोहितने आतापर्यंत १२८ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ९२९० धावा केल्या आहेत, येथे त्याची सर्वोच्च धावसंख्या ३०९* आहे. याशिवाय रोहितने प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये गोलंदाजी करताना २४ विकेट्सही घेतल्या आहेत.
संबंधित बातम्या