इंग्लंडविरुद्धच्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा फलंदाजीत चमक दाखवू शकला नाही. यशस्वी जैस्वालसह डावाची सुरुवात करण्यासाठी आलेला रोहित शर्मा अवघ्या २ धावा करून बाद झाला.
रोहित शर्माला खाते उघडण्यासाठी ५ चेंडू लागले, पण दुर्दैवाने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करताना त्याची विकेट गेली. अशाप्रकारे, रोहित शर्मा पुन्हा एकदा आपला फॉर्म परत मिळवण्यात अपयशी ठरला.
यापूर्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्येही रोहित शर्मा सुपर फ्लॉप झाला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या कसोटी मालिकेत रोहित शर्माला केवळ ३१ धावा करता आल्या. त्यामुळे त्याच्या कारकिर्दीवरही प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
मात्र, ऑस्ट्रेलियातून परतल्यानंतर त्याने रणजी ट्रॉफीतही मुंबईसाठी फलंदाजी केली, पण त्याच्यासाठी काहीही बदलले नाही. अशा परिस्थितीत टीम इंडियाच्या कर्णधारावरील दडपण आणखी वाढले आहे.
या सामन्यातील इंग्लंडच्या फलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर तेही अगदी सामान्य होती. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
मात्र, जॉस बटलर आणि जेकब बेथेल यांच्याशिवाय इंग्लंडच्या इतर कोणत्याही फलंदाजाला फलंदाजीत आपली छाप सोडता आली नाही. अशा स्थितीत पाहुणा संघ केवळ २४८ धावांवरच गार झाला.
तर गोलंदाजीत हर्षित राणाने टीम इंडियासाठी दमदार कामगिरी केली. हर्षितने टीम इंडियाकडून वनडे पदार्पण केले आणि पहिल्याच सामन्यात ३ विकेट्स घेतल्या. हर्षितशिवाय रवींद्र जडेजाने दमदार खेळ दाखवत ३ बळी घेतले, तर मोहम्मद शमी, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतली.
संबंधित बातम्या