T20 World Cup 2024: भारताने आयर्लंडविरुद्धच्या सामन्याने टी-२० विश्वचषक मोहिमेला सुरुवात केली. आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात ८ विकेट्सने विजय मिळवत भारताने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. रोहितने ३७ चेंडूत ५२ धावांची खेळी केली, ज्यात ३ षटकारांचा समावेश होता. त्यानंतर उजव्या खांद्याला दुखापत झाल्याने मैदानाबाहेर जाण्याचा निर्णय घेतला.
भारताकडून अष्टपैलू हार्दिक पांड्याने २७ धावांत ३ विकेट्स घेतले, बुमराहने ३ षटकांत ६ धावांत २ विकेट्स घेतले आणि डावखुरा गोलंदाज अर्शदीप सिंहने ३५ धावांत २ विकेट्स मिळवत आयर्लंडला अवघ्या ९६ धावांवर रोखले.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६०० षटकार मारणारा तो पहिला क्रिकेटपटू ठरला. रोहितने ४२७ सामन्यांत ही कामगिरी केली आहे. त्याखालोखाल ख्रिस गेल (४८३ सामन्यात ५५३ षटकार) आणि शाहिद आफ्रिदी (५२४ सामन्यात ४७६ षटकार) यांचा क्रमांक लागतो.
रोहितने टी-२० मध्ये ४००० धावांचा टप्पा ओलांडला आणि विराट कोहलीनंतर क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये ४००० पेक्षा जास्त धावा करणारा तो दुसरा फलंदाज ठरला. रोहितने टी-२० विश्वचषकात १००० धावा केल्या असून तो कोहलीनंतरचा दुसरा भारतीय आहे.
आयर्लंडविरुद्धच्या विजयानंतर रोहित भारताचा सर्वात यशस्वी टी-२० कर्णधार बनला. त्याने टी-२० मध्ये कर्णधार म्हणून एमएस धोनीच्या विजयाचा आकडा मागे टाकला. रोहितने कर्णधार म्हणून ५५ टी-२० ३३ सामन्यात ४२ विजय मिळवले आहेत. धोनीने ७३ सामन्यात ४१ सामने जिंकले आहेत. रोहितची विजयाची टक्केवारी (७७.२९) धोनीच्या (५९.२८) तुलनेत लक्षणीय आहे. कोहलीने कर्णधार म्हणून ५० टी-२० सामन्यात ३० विजय मिळवले आहेत.
टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या कर्णधाराच्या यादीत पाकिस्तानचा बाबर आझम पहिल्या स्थानावर आहे. त्याने ८१ सामन्यात ४६ विजय मिळवले आहेत. अमेरिकेचा ब्रायन मसाबा ४४ टी-२० विजयांसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्यानंतर इंग्लंडच्या इयॉन मॉर्गन आणि अफगाणिस्तानच्या असगर अफगाण यांनी प्रत्येकी ४२ टी-२० सामने जिंकले आहेत.
येत्या ९ जानेवारीला भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेटविश्वातील सर्वात मोठा सामना खेळला जाणार आहे. हा सामना नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. टी-२० विश्वचषकात पाकिस्तानला फक्त एकदाच भारताला हरवता आले. याशिवाय, सर्व सामने भारताने जिंकले आहेत.