Rohit Sharma Captaincy : टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर टीम इंडिया कसोटी मालिका खेळत आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव झाला. यामुळे कर्णधार रोहित शर्मावर प्रचंड टीका होत आहे.
रोहित शर्मा सेंच्युरियन कसोटीत कर्णधार म्हणून फ्लॉप ठरलाच, शिवाय फलंदाज म्हणूनही तो टीम इंडियासाठी कोणतेही योगदान देऊ शकला नाही. अशा स्थितीत त्याच्या कसोटी संघातील स्थानावर क्रिकेट तज्ज्ञ प्रश्न उपस्थित करत आहेत.
माजी भारतीय क्रिकेटपटू एस बद्रीनाथ यानेही आता रोहित शर्मावर टीका केली आहे. तो म्हणाला की, कसोटीमध्ये एक कमकुवत खेळाडू भारताचे नेतृत्व करत आहे. रोहितच्या जागी पुन्हा एकदा विराटकडे कसोटी कर्णधारपद सोपवण्याची सूचनाही त्याने केली आहे.
आपल्या यूट्यूब चॅनलवर बद्रीनाथने म्हटले आहे की, 'तो (विराट कोहली) कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व का करत नाही? मला हा न्याय्य प्रश्न उपस्थित करायचा आहे. तो एक चांगला कसोटीपटू आहे. त्याची आणि रोहित शर्माची तुलना होऊ शकत नाही.
जर आपण कसोटी क्रिकेटबद्दल बोललो तर विराट खूप मोठा खेळाडू आहे. त्याने कसोटीत सर्वत्र धावा केल्या आहेत. मग एक कमकुवत खेळाडू विराटचा कर्णधार कशासाठी?
रोहित आजपर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून स्वत:ला सिद्ध करू शकला नाही. रोहित शर्मा भारताबाहेरील कसोटी क्रिकेटमध्ये फ्लॉप झाला आहे, हे सर्व डोळ्यांसमोर असूनही तो अजूनही संघात कसा काय आहे?.
रोहित शर्माचा कसोटी रेकॉर्ड चांगला आहे. पण तो SENA (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) देशांमधील कसोटी सामन्यांमध्ये वाईटरित्या फ्लॉप झाला आहे. रोहितने या ४ देशांमध्ये २१ कसोटी सामने खेळले असून केवळ ३० च्या सरासरीने ११८२ धावा केल्या आहेत. त्याला केवळ एकच शतक झळकावता आले आहे.
याउलट विराट कोहलीचा या देशांमध्ये रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला आहे. विराट कोहलीने ६८ कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले असून यापैकी ४० सामन्यांमध्ये त्याने टीम इंडियाला विजय मिळवून दिला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकली होती.