Rohit Sharma Ind vs Eng 1st ODI : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन वनडे सामन्यांची मालिका आज ६ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या मालिकेतील पहिला सामना नागपुरात होणार आहे. या मालिकेत सर्वांच्या नजरा रोहित शर्मा आणि विराट कोहलीवर असणार आहेत. कारण हे दोन्ही खेळाडू गेल्या काही काळापासून खराब फॉर्मशी झगडत आहेत. अशा परिस्थितीत रोहितच्या भवितव्यावर सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहेत.
नागपूर वनडे सामन्यापूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने पत्रकार परिषद घेतली. यावेळी रोहितला त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील भविष्याबद्दल विचारण्यात आले. यावरून रोहित थोडा चिडलेला दिसला.
रोहित शर्मा याने पत्रकार परिषदेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याच्या भविष्याबाबत बोलण्यास नकार दिला. सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत रोहित म्हणाला, 'जेव्हा तीन वनडे आणि चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन होणार आहे, तेव्हा माझ्या भविष्यातील योजनांबद्दल बोलणे कितपत योग्य आहे.
माझ्या भवितव्याबद्दलची चर्चा अनेक वर्षांपासून सुरू आहे आणि त्या बातम्यांवर स्पष्टीकरण देण्यासाठी मी येथे आलो नाही. माझ्यासाठी हे तीन सामने आणि चॅम्पियन्स ट्रॉफी खूप महत्त्वाची आहे. माझे लक्ष या सामन्यांवर आहे आणि यानंतर काय होते ते मी बघेन'.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) रोहितला चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर त्याच्या भविष्यातील योजनांबद्दल सांगण्यास सांगितले आहे. त्याचवेळी रोहितला आगामी सामन्यांवर लक्ष केंद्रित करायचे आहे.
रोहित म्हणाला, 'हा वेगळा फॉरमॅट आहे, वेगळा काळ आहे. क्रिकेटपटू म्हणून चढ-उतार असतील आणि मी माझ्या कारकिर्दीत अशा अनेक गोष्टींचा सामना केला आहे. हे माझ्यासाठी काही नवीन नाही. आम्हाला माहित आहे की प्रत्येक दिवस हा नवीन दिवस असतो, प्रत्येक मालिका ही नवीन मालिका असते.
मी भूतकाळात काय घडले यावर लक्ष केंद्रित न करता पुढील आव्हानाची वाट पाहत आहे. मला मागे वळून पाहण्याचे कारण नाही. पुढे काय होणार आहे आणि माझ्यासाठी पुढे काय आहे यावर मी लक्ष केंद्रित करणे महत्वाचे आहे. ही मालिका मोठ्या थाटात सुरू करण्याचा मी प्रयत्न करेन.
पत्रकार परिषदेत रोहित शर्माने यष्टिरक्षका बाबतच्या प्रश्नालाही उत्तर दिले. वास्तविक, केएल राहुल आणि ऋषभ पंत यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत प्लेइंग ११ मध्ये कोणाचा समावेश होणार हा मोठा प्रश्न आहे.
रोहित म्हणाला, 'केएल राहुल गेल्या अनेक वर्षांपासून वनडे फॉरमॅटमध्ये आमच्यासाठी विकेटकीपिंग करत आहे आणि त्याने चांगली कामगिरी केली आहे. जर तुम्ही शेवटचे १०-१५ एकदिवसीय सामने पाहिले तर त्याने संघाला त्याच्याकडून जे अपेक्षित होते तेच केले आहे. ऋषभही उपस्थित आहे. आमच्याकडे त्यापैकी कोणत्याही एकाला खेळवायचा पर्याय आहे.
दोघांमध्ये स्वबळावर सामना जिंकण्याची क्षमता आहे. राहुल किंवा ऋषभ यांच्यात कोणाला खेळवायचे, ही चांगलीच डोकेदुखी ठरणार आहे. पण मागील कामगिरी पाहता सातत्य राखणेही आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे', असे रोहित म्हणाला.
संबंधित बातम्या