मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Rohit Sharma : टी-20 मध्ये रोहित शर्माची सर्वाधिक शतकं, हिटमॅन-रिंकूची १९० धावांची विक्रमी भागिदारी, पाहा

Rohit Sharma : टी-20 मध्ये रोहित शर्माची सर्वाधिक शतकं, हिटमॅन-रिंकूची १९० धावांची विक्रमी भागिदारी, पाहा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 17, 2024 09:07 PM IST

Rohit Sharma T20 Hundred : रोहित शर्माने अवघ्या ६४ चेंडूत आपले शतक केले. त्याला रिंकू सिंगने चांगली साथ दिली.

Rohit Sharma T20 Hundred
Rohit Sharma T20 Hundred (AP)

Rohit Sharma century : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात आज (१७ जानेवारी) शेवटचा टी-20 सामना खेळला जात आहे. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने शतकी खेळी केली. रोहितने आपल्या टी-20 करिअरचे विक्रमी पाचवे शतक ठोकले.

रोहित शर्माने अवघ्या ६४ चेंडूत आपले शतक केले. त्याला रिंकू सिंगने चांगली साथ दिली. 

एकेकाळी टीम इंडियाने अवघ्या २२ धावांत ४ विकेट गमावल्या होत्या, तिथून रोहित शर्मा आणि रिंकू सिंग यांनी मिळून पहिला डाव रचला आणि नंतर विक्रमी भागीदारी केली. टी-20 इंटरनॅशनलमध्ये पाचव्या विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी करण्याचा विश्वविक्रमही दोघांमध्ये झाला. या जोडीने पाचव्या विकेटसाठी १९० धावांची भागीदारी केली.

रोहित आणि रिंकू या दोघांनी भारताची धावसंख्या २० षटकात २१२ धावांपर्यंत पोहोचवली. या सामन्यात रोहितने ६९ चेंडूत नाबाद १२१ धावा केल्या. यादरम्यान त्याने ८ षटकार आणि ११ चौकार मारले. दुसरीकडे, रिंकूने ३९ चेंडूत ६९ धावांची नाबाद खेळी केली. त्याने ६ षटकार आणि २ चौकार मारले.

शेवटच्या ५ षटकात १०३ धावा

रोहित आणि रिंकूने शेवटच्या ५ षटकात एकही विकेट न गमावता १०३ धावा केल्या. शेवटचे षटक टाकण्यासाठी करीम जनत आला आणि या षटकात रोहित आणि रिंकूने ३६ धावा केल्या.

रोहितने पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकला. यानंतर रोहितने दुसऱ्या चेंडूवर षटकार ठोकला. हा नो बॉल होता. फ्री हिटवर रोहितने पुन्हा षटकार ठोकला. तिसऱ्या चेंडूवर रोहितने एक धाव घेतली. रिंकूने चौथ्या चेंडूवर षटकार ठोकला. यानंतर रिंकूने शेवटच्या तीन चेंडूंवर सलग तीन षटकार ठोकले.

पहिल्या दोन सामन्यात शुन्यावर बाद

या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात रोहित शर्मा शुन्यावर बाद झाला होता. १४ महिन्यांनंतर टी-20 फॉरमॅटमध्ये असे लाजिरवाणे पुनरागमन केल्यानंतर चाहत्यांनी त्याला ट्रोल केले. 

पण या सामन्यात रोहितने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण संघाची सुरुवात खूपच खराब झाली. पॉवरप्लेमध्ये संघाने ४ मौल्यवान विकेट गमावल्या. यशस्वी जैस्वाल ४, विराट कोहली ०, संजू सॅमसन ० आणि शिवम दुबे १ धाव करून बाद झाले.

यानंतर रोहितने रिंकू सिंगला साथीला घेत डाव सावरला आणि संघाला २१२ धावांपर्यंत पोहोचवले.

सामन्यात रोहितने पाडला विक्रमांचा पाऊस

रोहितने आधी ४१ चेंडूत अर्धशतक केले आणि त्यानंतर लगेचच गीअर्स बदलले. त्याच्या पुढच्या ५० धावा फक्त २२ चेंडूत झाल्या. या ऐतिहासिक खेळीत रोहित शर्माने विक्रम केले. 

ग्लेन मॅक्सवेल आणि सूर्यकुमार यादव यांच्या प्रत्येकी ४ शतकांना मागे टाकत तो T-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारा फलंदाज बनला. 

यासोबत रोहित T20 मध्ये सर्वाधिक षटकार मारणारा कर्णधार बनला आहे. त्याने या बाबतीत इंग्लंडचा माजी कर्णधार इऑन मॉर्गनलाही मागे टाकले.

रोहितने T20I मध्ये कर्णधार म्हणून ८७ षटकार मारले आहेत, तर मॉर्गनच्या नावे ८६ षटकार आहेत.

यानंतर रोहित कर्णधार म्हणून टी-20 मध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने विराट कोहलीला मागे टाकले आहे. रोहितच्या नावे आता १६४७ धावा आहेत. या यादीत तो माजी कर्णधार विराट कोहली १५७० आणि एमएस धोनी १११२ यांच्यापेक्षा खूप पुढे गेला आहे. रोहितच्या १२१ धावा ही T20I मधील कोणत्याही भारतीय फलंदाजाने केलेली चौथी सर्वोच्च खेळी आहे.

WhatsApp channel