टी-20 वर्ल्ड कप २०२४ च्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये रोहित शर्माने इंग्लंडविरुद्ध ५७ धावांची इनिंग खेळून अनेक मोठे विक्रम केले आहेत. कर्णधारपदाला साजेशी खेळी खेळताना त्याने टीम इंडियाला १७१ धावांपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
यासह 'हिटमॅन'ने विक्रमांची मालिका रचली असून एमएस धोनी, विराट कोहली, मोहम्मद अझरुद्दीन आणि सौरव गांगुली यांचीही बरोबरी केली आहे. याशिवाय त्याने भारताचा कर्णधार म्हणून एक विशेष विक्रमही केला आहे.
रोहित शर्माने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात ५७ धावांची खेळी करताना भारताचा कर्णधार म्हणून ५ हजार आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा रोहित हा भारताचा ५वा कर्णधार आहे. आता टीम इंडियाचा कर्णधार म्हणून त्याने १२२ सामन्यांमध्ये ५,०१३ धावा केल्या आहेत.
रोहित शर्माच्या आधी, विराट कोहली, एमएस धोनी, मोहम्मद अझरुद्दीन आणि सौरव गांगुली यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचा कर्णधार म्हणून ५,००० किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत.
या यादीत रोहितच्या पुढे सौरव गांगुली आहे, ज्याने भारतीय कर्णधार म्हणून १९५ सामने खेळले आणि ७,६४३ धावा केल्या. अझरुद्दीन तिसऱ्या स्थानावर आहे, त्याने २२१ सामन्यांमध्ये ८,०९५ धावा केल्या आहेत. धोनीने सर्वाधिक सामन्यांमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले असले तरी सर्वाधिक धावा करणारा तो कर्णधार नाही.
त्याने ३३२ सामन्यात ११,२०७ धावा केल्या. या यादीत सर्वात वरच्या क्रमांकावर विराट कोहलीचे नाव आहे, ज्याने २१३ सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व करताना १२,८८३ धावा केल्या आहेत.
-विराट कोहली: १२,८८३ धावा (२१३ सामने)
-एमएस धोनी: ११,२०७ धावा (३३२ सामने)
- मोहम्मद अझरुद्दीन: ८,०९५ धावा (२२१ सामने)
-सौरव गांगुली: ७,६४३ धावा (१९५ सामने)
- रोहित शर्मा: ५,०१३ धावा (१२२ सामने)
रोहित शर्माच्या कारकिर्दीवर नजर टाकली तर त्याने भारतासाठी आतापर्यंत ४७८ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने एकूण १९,०११ आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत. रोहितने १५७ टी-20 सामन्यात ४,१६५ धावा केल्या आहेत. दुसरीकडे, एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने २६२ सामने खेळताना १०,७०९ धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये रोहितच्या ५९ सामन्यांमध्ये ४,१३७ धावा आहेत.
संबंधित बातम्या