भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना २७ सप्टेंबरपासून कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर सुरू आहे. पहिल्या दिवशी पावसामुळे खेळ उशिरा सुरू झाला, त्यामुळे केवळ ३५ षटकांचा खेळ झाला, ज्यामध्ये बांगलादेशने ३ गडी गमावून १०७ धावा केल्या. पण सर्वात आधी या मैदानावर रोहित शर्माने घेतलेला एक निर्णय चर्चेत आला आहे.
भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून बांगलादेशला गोलंदाजीसाठी आमंत्रित केले. कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानावर नाणेफेक जिंकून कर्णधाराने प्रथम गोलंदाजी घेण्याचा निर्णय खूप खास ठरला. कारण गेल्या ६० पहिल्यांदाच ग्रीन पार्कवर एखाद्या कर्णधाराने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली आहे.
याआधी १९६४ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय कर्णधार मन्सूर अली खान पतौडी यांनी टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तो सामना अनिर्णीत राहिला.
गेल्या ९ वर्षांत भारताने आपल्याच भूमीवर कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. शेवटच्या वेळी असे २०१५ मध्ये घडले होते. तेव्हा भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. योगायोगाने तो सामनाही अनिर्णित राहिला.
बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारताने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. यासह रोहित शर्मा कसोटी मालिकेत प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल न करणारा गेल्या ५ वर्षांतील पहिला कर्णधार ठरला आहे.
सध्याच्या मालिकेत टीम इंडिया १-० ने पुढे आहे. भारताने पहिला सामना २८० धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला होता. दुसरा सामना जिंकणे देखील भारतीय संघासाठी महत्त्वाचे आहे, कारण सामना ड्रॉ राहिला तर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये भारतीय संघासाठी हानिकारक ठरू शकतो.