Rohit Sharma Ritika Sajdeh Baby Boy News In marathi : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्यांदा बाप झाला आहे. रोहितची पत्नी रितिका सजदेह हिने मुलाला जन्म दिला आहे. रोहित आणि रितिका यांना समायरा नावाची एक मुलगी आहे. रोहितच्या कुटुंबियांसह भारतीय संघ आणि भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी ही बातमी एखाद्या मोठ्या खुशखबरपेक्षा कमी नाही.
आता पर्थ कसोटी सामन्यात रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसतो की नाही हे पाहावे लागेल.
दरम्यान, चाहत्यांनी रोहित आणि रितिकाबद्दल सोशल मीडियावर अनेक पोस्ट शेअर केल्या आहेत. मात्र, अद्याप रोहित किंवा रितिका यांच्याकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
सोशल मीडियावरील माहितीनुसार रोहितची पत्नी रितिका सजदेह हिने शुक्रवारी (१५ नोव्हेंबर) एका मुलाला जन्म दिला. रोहित शर्मा आणि रितिका सजदेह यांना समायरा नावाची मुलगी आहे. रोहित आणि रितिका यांचा विवाह १३ डिसेंबर २०१५ रोजी झाला होता. या दोघांच्या लग्नाला ९ वर्षे पूर्ण होणार आहेत.
या गोड बातमीनंतर आता रोहित शर्मा बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात भाग घेऊ शकतो. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २२ नोव्हेंबरपासून ५ कसोटी सामने सुरू होणार आहेत. याआधी रोहित या मालिकेतील सुरुवातीचे दोन सामने खेळणार नसल्याची माहिती समोर आली होती.
मात्र, रोहित शर्मा आता संपूर्ण मालिका खेळताना दिसू शकतो. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दृष्टिकोनातूनही ही मालिका भारतीय संघासाठी खूप महत्त्वाची आहे. भारताला डब्ल्यूटीसी फायनल खेळायची असेल तर ऑस्ट्रेलियाला ४-१ ने पराभूत करावे लागेल. ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर हरवणे अजिबात सोपे नाही.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीतील रोहित शर्माच्या कामगिरीबद्दल बोलायचे तर, भारतीय कर्णधाराने कांगारू संघाविरुद्ध १२ कसोटी सामने खेळले आहेत. या काळात त्याने २२ डावात ३३.७१ च्या सरासरीने ७०८ धावा केल्या आहेत. रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ अर्धशतकं आणि १ शतक झळकावलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत रोहितची सर्वोच्च धावसंख्या १२० धावा आहे.
पहिली कसोटी: २२ ते २६ नोव्हेंबर
दुसरी कसोटी : ६ ते १० डिसेंबर
तिसरी कसोटी: १४ ते १८ डिसेंबर
चौथी कसोटी: २६ ते ३० डिसेंबर
पाचवी कसोटी: ३ ते ७ जानेवारी