न्यूझीलंडने भारतात येऊन टीम इंडियाचा तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत ३-० असा पराभव केला आहे. मालिकेतील तिसरा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियासमोर विजयासाठी १४७ धावांचे लक्ष्य होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारत १२१ धावांवर गारद झाला.
टीम इंडियाकडून ऋषभ पंतने ६४ धावांची शानदार खेळी करत भारताच्या आशा जिवंत ठेवल्या. भारताला १०० धावांच्या पुढे नेल्यानंतर तो बाद झाला आणि एजाज पटेल (६-५७) आणि ग्लेन फिलिप्स (३-४२) यांच्यामुळे भारताचा विजयाचा मार्ग कठीण झाला.
या पराभवासह भारत आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. घरच्या मैदानावर ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताचा व्हाईटवॉश होण्याची ही इतिहासातील पहिलीच वेळ आहे. यामुळे भारतीय चाहते खूप निराश झाले आहेत.
भारतीय संघाचा कर्णधार आणि अनुभवी फलंदाज रोहित शर्मासाठी ही मालिका खूपच वाईट ठरली. या मालिकेत त्याची बॅट पूर्णपणे शांत राहिली. यानंतर आता टीम इंडियाच्या कर्णधारावर चाहते नाराज झाले असून त्याच्या निवृत्तीची मागणी करत आहेत. रोहितने ३ सामन्यांच्या ६ डावात केवळ ९१ धावा केल्या.
न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 235 धावा केल्या. याला प्रत्युत्तर देताना टीम इंडियाने मुंबई कसोटीत 263 धावा केल्या. दुसऱ्या डावात न्यूझीलंडने 174 धावा केल्या आणि भारताला 147 धावांचे लक्ष्य दिले. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ 121 धावांवर ऑलआऊट झाला आणि सामना 25 धावांनी गमावला.