भारत आणि बांगलादेश यांच्यात कसोटी मालिकेतील पहिला सामना चेन्नईत खेळला जात आहे. टीम इंडियाने पहिल्या डावात ३७६ धावा केल्या. त्यानंतर बांगलादेशला १४९ धावांत गुंडाळल्यानंतर आता भारताचा दुसरा डाव सुरू असून संघाने मोठी आघाडी घेतली आहे. आज (२१ सप्टेंबर) सामन्याचा तिसरा दिवस आहे.
दरम्यान, रोहित शर्माचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रोहित या व्हिडीओत संतापलेला दिसत असून तो आपल्या सहकारी खेळाडूंवर ओरडताना दिसत आहे. रोहितचा हा व्हिडिओ X वर शेअर करण्यात आला आहे. रोहित शर्माचा हा व्हिडीओ सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा (२० सप्टेंबर) आहे.
व्हिडीओत नेमकं काय?
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ बांगलादेशच्या डावातील आहे. बांगलादेशचा संघ पहिल्या डावात १४९ धावांवर गडगडला. यादरम्यान रोहित त्याच्या सहकारी खेळाडूंवर रागावलेला दिसत होता. व्हायरल व्हिडिओमध्ये तो म्हणाला, 'सगळे झोपले आहेत.' रोहितच्या व्हिडीओवर चाहत्यांच्या रंजक प्रतिक्रियाही पाहायला मिळत आहेत.
याआधी रोहितचा शुभमन गिलसोबतचा एक व्हिडिओ पाहण्यात आला होता. यामध्ये तो मस्करीच्या मूडमध्ये दिसत होता.
टीम इंडियासाठी चेन्नई कसोटीत रोहित शर्मा आणि विराट कोहली बॅटने काही खास करू शकले नाहीत. पहिल्या डावात ६ आणि दुसऱ्या डावात ५ धावा केल्यानंतर रोहित बाद झाला. यानंतर कोहलीही पहिल्या डावात ६ आणि दुसऱ्या डावात १७ धावा करून बाद झाला. यशस्वी जैस्वालने पहिल्या डावात अर्धशतक झळकावले होते. पण दुसऱ्या डावात केवळ १० धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
टीम इंडियासाठी रविचंद्रन अश्विनने पहिल्या डावात शतक झळकावले. त्याने १३३ चेंडूंचा सामना करत ११३ धावा केल्या. तर रवींद्र जडेजाने ८६ धावांची खेळी केली. जडेजाने १२४ चेंडूंचा सामना करताना १० चौकार आणि २ षटकार मारले. ऋषभ पंतने ३९ धावांची खेळी केली होती. टीम इंडियाला दुसऱ्या डावातही जडेजा आणि अश्विन यांच्याकडून आशा असतील.