कानपूर कसोटीत भारताने बांगलादेशला पहिल्या डावात २३३ धावांवर गारद केले. यानंतर फलंदाजीत भारतीय संघाने विश्वविक्रम केला आहे. बांगलादेशला २३३ धावांत गुंडाळल्यानंतर पहिला डाव खेळायला आलेल्या टीम इंडियाने अवघ्या १८ चेंडूत असा विक्रम केला ज्याचा कोणी विचारही केला नसेल.
पहिले तीन दिवस पावसामुळे वाया गेले, त्यामुळे टीम इंडियासाठी हा महत्त्वाचा सामना जिंकणे एक आव्हान ठरत आहे. मात्र, भारतीय संघ हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. आज चौथ्या दिवशी (३० सप्टेंबर) भारताने बांगलादेशच्या ७ झटपट विकेट्स घेतल्या आणि नंतर तुफानी फलंदाजी करत इतिहास रचला.
रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल मैदानात येताच त्यांनी सोबत तुफान आणले. हे धावांचे वादळ होते. ते येताच दोघांनीही तुफानी फलंदाजी सुरू केली. या दोघांची फलंदाजी पाहून पांढऱ्या कपड्यात टी-२० सामना खेळला जात असल्याचा भास होत होता.
दोघांनी अवघ्या तीन षटकात संघाचे अर्धशतक फलकावर लावले. कसोटीत कोणत्याही संघाने केलेले हे सर्वात जलद अर्धशतक आहे. यापूर्वी हा विक्रम इंग्लंडच्या नावावर होता, त्यांनी यावर्षी वेस्ट इंडिजविरुद्ध ४.२ षटकांत अर्धशतक पूर्ण केले होते. भारताने कोणत्याही फॉरमॅटमध्ये अवघ्या ३ षटकांत अर्धशतक पूर्ण करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
रोहित शर्मा ११ चेंडूत २३ धावा करून मेहदी हसनच्या गोलंदाजीवर बोल्ड झाला. त्याने ३ षटकार आणि १ चौकार मारला. तर जैस्वाल ५१ चेंडू ७१ धावा करून बाद झाला. त्याने १२ चौकार आणि २ षटकार मारले.
सामान्यत: कसोटीमध्ये फलंदाज आरामात फलंदाजी करतात आणि ५० धावा करण्यासाठी ८-१० षटके घेतात, पण सामना जिंकण्याच्या इच्छेने दोघांनाही आपली उग्र बाजू दाखवायला भाग पाडले.
यासोबतच रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वालच्या नावावर आणखी एक विक्रम झाला आहे. रोहित आणि यशस्वी यांची जोडी ही भारतासाठी कोणत्याही फॉरमॅटमध्ये सर्वात जलद अर्धशतकी भागीदारी करणारी जोडी बनली आहे. रोहितने या सामन्यात खेळलेल्या पहिल्या दोन चेंडूंवर षटकार ठोकले.
आपल्या डावातील पहिल्या दोन चेंडूंवर षटकार ठोकणारा तो जगातील चौथा फलंदाज ठरला आहे. या यादीत सचिन तेंडुलकरचेही नाव आहे.