टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली. भारताने केपटाऊन कसोटीत आफ्रिकेचा ७ विकेट्सनी पराभव केला. यासह भारताने ३१ वर्षानंतर केपटाऊनमध्ये कसोटी सामना जिंकला. भारत १९९२ पासून केपटाऊनमध्ये कसोटी खेळत आहे, पण त्यांना तिथे एकदाही कसोटी जिंकता आली नव्हती.
विशेष म्हणजे, हा कसोटी सामना आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू डीन एल्गरच्या करिअरचा शेवटचा सामना होता. एल्गर आता कधीच आफ्रिकेच्या जर्सीत खेळताना दिसणार नाही. दरम्यान हा कसोटी सामना केवळ दीड दिवसात संपला.
डीन एल्गरने आपल्या करिअरचे शेवटचे दोन डाव कसोटीच्या पहिल्याच दिवशी (५ जानेवारी) खेळले. एल्गर कसोटीच्या पहिल्याच दिवशी दोनदा बाद झाला. त्याच्या शेवटच्या कसोटीत आफ्रिकेचा पराभव झाला. आफ्रिकेला एल्गरला विजयी निरोप देता आला नाही.
पण टीम इंडियाच्या खेळाडूंनी दिग्गज डीन एल्गरचा शेवटचा सामना खास बनवला. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीने सामना संपल्यानंतर एल्गरला खास भेट देऊन या पराभवाचे दु:ख कमी करण्याचा प्रयत्न केला.
भारताविरुद्धची कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वीच डीन एल्गरने निवृत्ती जाहीर केली होती. यानंतर सेंच्युरियन कसोटी सामन्यात एल्गरच्या बॅटमधून १८५ धावांची उत्कृष्ट खेळी पाहायला मिळाली. याच्या जोरावर आफ्रिकन संघाने हा सामना एका डाव आणि ३२ धावांनी जिंकला.
मात्र, केपटाऊन कसोटीत कर्णधार म्हणून खेळलेल्या एल्गरला दोन्ही डावात फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही.
सामना संपल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने डीन एल्गरला भारतीय संघातील सर्व खेळाडूंनी स्वाक्षरी केलेली जर्सी भेट दिली. याशिवाय विराट कोहलीनेही एल्गरला त्याची जर्सी भेट दिली.
केपटाऊनच्या न्यूलँड्स येथे खेळल्या गेलेल्या या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज या जोडीने भारतीय संघाच्या विजयात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली. या सामन्यात सिराजने ७ विकेट्स घेतल्या, तर जसप्रीत बुमराहने ८ विकेट्स घेतल्या. या सामन्यातील विजयासह भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत थेट पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.
संबंधित बातम्या